“करोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही हात, पाय, तोंड, सर्व काही धुवाल मात्र तुमच्या अशुद्ध आत्म्याचं काय?” असा प्रश्न अभिनेत्री राखी सावंत हिने उपस्थित केला आहे. बॉलीवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. अलिकडेच ती करोना विषाणूला नष्ट करण्यासाठी चक्क चीनमध्ये जायला निघाली होती. यावरुन तिची अनेकांनी खिल्ली देखील उडवली. मात्र यानंतर आता पुन्हा एकदा तिने करोनाविषयी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

काय म्हणाली राखी सावंत?
राखी म्हणते, “करोना व्हायरस जगभरात पसरला आहे. सगळेजण तुम्हाला सांगतायत हात धुवा, पाय धुवा.. डोक धुवा.., तोंड धुवा.. सगळं धुवा पण हा आत्मा कसा धुणार? आपण खूप पापं केली आहेत. जगात सगळ्यांनी पापं केली आहेत. तु्म्हाला काय वाटतं हा करोना व्हायरस कुठून आला आहे? करोना लोकांना धडा शिकवायला आला आहे. मी सांगते तुम्ही अजूनही देवाच्या चरणी या. आपल्या पापांची माफी मागा. माझी खात्री आहे तुम्हाला करोना व्हायरस कधीही होणार नाही.” अशा आशयाची वक्तव्य राखीने या व्हिडीओमध्ये केली आहेत.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. जगभरातील लोक सध्या करोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर राखीच्या या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तर तिची खिल्ली देखील उडवली आहे.