वसई: वसईत मामानेच भाचीला चालत्या लोकल मधून ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास भाईंदर ते नायगाव स्थानकादरम्यान ही घटना घडली. यात १६ वर्षीय भाचीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी मामा अर्जुन सोनी (२०) याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे.
१६ वर्षीय भाची ही मूळची मुंबईच्या मानखुर्द येथे राहणारी आहे. मागील दोन दिवसांपूर्वी ती वसई पूर्वेच्या वालीव परिसरात राहत असलेल्या मामाच्या घरी राहण्यास आली होती. मात्र, १५ नोव्हेंबर रोजी कोणालाच न सांगता ती घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध करूनही ती सापडली नाही. त्यामुळे ती बेपत्ता असल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात तिच्या नातेवाईकांनी केली नोंदवली होती. मात्र तिच्या मामीने मामा अर्जुन सोनी यांना संपर्क केला असता त्याने ती आमच्यासोबत असल्याचे सांगितले. तिचा मामा तिला भाईंदरवरून नालासोपारा येथे लोकलने घेऊन निघाला होता. पण, लोकल नायगाव भाईंदर दरम्यान पोहचताच अर्जुन याने भाचीला चालत्या लोकलमधून ढकलून दिले. यात लोकलमधून पडून तिचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी सुरुवातीला वसई रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. पण, त्यानंतर ही पुढील चौकशीसाठी हे प्रकरण वालीव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे.
या घटनेत मयत झालेली मुलगी वालीव पोलिसांच्या हद्दीतून बेपत्ता झाली असल्याने वालीव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. याप्रकरणी सोमवारी मुलीचा मामा अर्जुन सोनी याला पोलिसांनी अटक केली. तर मंगळवारी न्यायालयीन चौकशीसाठी पोलिसांनी आरोपीला वसई सत्र न्यायालयात हजर केले असल्याचे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी सांगितले आहे.
