वसई : विरार पूर्वेच्या कोपर गावात क्रिकेटचा सराव करताना २७ वर्षीय तरुणाचा मैदानातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर मोतीराम वझे असे या तरुणाचे नाव आहे.वसई विरार भागात सध्या टेनिस क्रिकेटचा जोर चांगलाच वाढला आहे. विविध ठिकाणी स्पर्धा ही आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे विविध गावातील क्रिकेट संघ व खेळाडू यांचा मैदानी सरावाला ही वेग आला आहे.
शनिवारी २५ जानेवारीला सायंकाळी नेहमीप्रमाणे सागर हा आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत कोपर गावाजवळील मैदानात क्रिकेटच्या सरावासाठी गेला होता. सरावाच्या सामन्या दरम्यान सागर फलंदाजीसाठी उतरला होता. त्यावेळी त्याने लागोपाठ दोन षटकार ठोकत सामन्यात अधिकच रंगत ही आणली होती.मात्र त्याच्या अचानकपणे छातीत दुखून आल्याने तो मैदानावर कोसळला. त्यामुळे इतर मुलांनी त्याच्याकडे धाव घेऊन त्याला त्याच्या नातेवाईकांसह तात्काळ जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. मात्र पुढील उपचारासाठी दाखल करण्या पूर्वीच्या तपासणीत त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले .ऐन तारुण्यात अवघ्या २७ व्या वर्षी त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे कोपर गावासह आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सागर याच्या मृत्यू पश्चात त्याचे आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.
© The Indian Express (P) Ltd