वसई: वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या वैतरणा जेट्टीची नासधूस होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय जेट्टी तयार करताना वैतरणा व वाढीव येथील दोन्ही जेटींना पायऱ्या, टप्पे बांधणे आवश्यक असताना ते बांधण्यात न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरार जवळील भागात वैतरणा वाढीव परिसर आहे. या भागात ये-जा करण्यासाठी सुरुवातीला केवळ रेल्वे मार्ग हा एकमेव मार्ग असल्याने रेल्वेपुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत होता. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.  या घटना रोखण्यासाठी वैतरणा व वाढीव अशा दोन्ही ठिकाणी मेरी टाइम बोर्ड यांच्यातर्फे जेट्टी उभारण्यात आल्या आहेत. या जेट्टीमुळे दोन्ही भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे.

असे जरी असले तरी या जेट्टीच्या  शेवटच्या दोन्ही  टोकावर ६ ते ७ फुटांचा कडा तयार केला आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे टप्पे व पायऱ्या तयार करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे  वाढीव , वैतरणा गावातील नागरिकांना आपल्या खासगी बोटीतून प्रवासा दरम्यान पाण्याचा अंदाज येत नसल्याने  अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुकताच वैतरणा येथील एकाच कुटुंबातील दोन मुली जेट्टीवर फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. याच दरम्यान त्यांचा तोल जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. जर जेट्टीवर डायरेक्ट कडय़ा ऐवजी जर टप्पे असते तर किमान त्या खोलीचा अंदाज आला असता असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेल्या जेट्टीवर भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वैतरणा आणि वाढीव ह्य दोन्ही जेट्टीवर टप्पे, पायरी बांधण्यात याव्यात तसेच  नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी तयार करण्यात आलेल्या या जेटींचा वापर इतर कामासाठी असलेल्या बोटी देखील करत असल्यामुळे त्या बोटींच्या दबावामुळे जेटीची नासधूस होऊ लागली आहे. येथील पथदिवे ही बंद आहेत.

या सर्व समस्या सोडवण्यात याव्यात अशी  डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे मेरिटाईम बोर्ड व  जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

वैतरणा जेट्टीवर टप्पे व पायऱ्या न केल्याने पटकन पाण्याच्या खोलीचा अंदाज घेता येत नाही. तर दुसरीकडे जेट्टीची काही भागात नासधूस, बंद असलेले पथदिवे अशा  विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी व मेरिटाइम बोर्ड याबाबत तक्रार केली आहे.

सतीश गावड, उपाध्यक्ष डहाणू वैतराणा प्रवासी सेवाभावी संस्था

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident risk at vaitarna jetty zws