भाईंदर : मिरा रोड येथे नवरात्रीच्या काळात अंडे फेकल्याच्या प्रकारानंतर हे प्रकरण चांगलेच पेटून उठले आहे. या इमारतीला नुकतीच मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन, असे प्रकार सरकार खपवून घेणार नाहीत, असा इशारा दिला.मिरा रोड येथील जे. पी. इन्फ्रा या इमारतीत नवरात्रीदरम्यान झालेल्या वादात एका इसमाने गरबा कार्यक्रमावर चक्क अंडे फेकल्याचा आरोप सोसायटीतील सदस्यांनी केला होता. या प्रकरणी मोसीन खान नावाच्या व्यक्तीवर काशिगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या धार्मिक भावना भडकल्या असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी मंत्री नितेश राणे यांनी संबंधित इमारतीला भेट देऊन सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी “सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असे आश्वासन दिले.
यानंतर बोलताना राणे म्हणाले, “मिरा रोड परिसरात एका विशिष्ट समुदायामुळे वारंवार वाद निर्माण होत आहेत. हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र याला आता सडेतोड उत्तर दिले जाईल. आमच्या सणाचा विरोध करण्याचा प्रयत्न झाल्यास, आम्ही तुमच्या घराबाहेर दिवाळीचे फटाके फोडू,” असा इशारा त्यांनी दिला.याशिवाय काँग्रेसकडून सुरू असलेल्या ‘आय लव्ह मोहम्मद’ आंदोलनावरही त्यांनी टीका केली.