भाईंदर : उत्तन येथील महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पावरील ताण कमी करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ८ लघु बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी प्रशासनाने घेतला होता. मात्र यापैकी केवळ ४ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित चार प्रकल्पांची उभारणी रखडल्याचे समोर आले आहे.
मिरा भाईंदर शहरातून दररोज सुमारे ५५० मॅट्रिक टन कचरा निर्माण होतो. यापैकी सुमारे २०० मॅट्रिक टन ओला कचरा असतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात ८ ठिकाणी बायोमिथेनायझेशन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पांद्वारे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून नैसर्गिक वायू तयार केला जातो.या प्रकल्पांसाठी एकूण ४५ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. यामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला १६ कोटी ७७ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून उर्वरित खर्च महापालिकेच्या निधीतून केला जाणार होता.
मात्र, मागील चार वर्षांत प्रशासनाला केवळ चार प्रकल्प उभारण्यात यश आले आहे. उर्वरित चार ठिकाणी जागेची तसेच निधीची अडचण असल्यामुळे प्रकल्पांची उभारणी थांबली आहे. परिणामी, ओला कचरा पुन्हा उत्तनच्या कचरा प्रकल्पावरच नेला जात असून दुर्गंधीमध्ये मोठी वाढ झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नैसर्गिक वायू निर्मितीत अडथळे
मिरा भाईंदर महापालिकेने सध्या चार बायोगॅस प्रकल्प सुरू केले आहेत, ज्यामध्ये सुमारे ५० मॅट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. सुरुवातीला या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्याचा करार अदानी इलेक्ट्रिक संस्थेसोबत करण्यात आला होता. मात्र, मिळणाऱ्या विजेच्या तुलनेत प्रकल्प उभारणीचा खर्च कितीतरी पटीने अधिक असल्यामुळे हे काम रद्द करण्यात आले.त्यानंतर कचऱ्यापासून नैसर्गिक वायू निर्माण करण्याची तयारी महानगर गॅस संस्थेने दर्शवली. मात्र, गॅस निर्मितीसाठी त्यांना १०० मॅट्रिक टन कचऱ्याची आवश्यकता असल्यामुळे बायोगॅस प्रकल्पांचे प्रमाण वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी माहिती उपायुक्त सचिन बांगर यांनी दिली आहे.
काम सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा
शहरात आठ पैकी केवळ चार बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित असतानाही यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेने तीन नव्या ठिकाणी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार,महाजनवाडी येथील संघवी इकोसिटी (आरक्षण क्रमांक ३६८) – २० मॅट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प,पेणकरपाडा (आरक्षण क्रमांक ३५३) – २० मॅट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प,तन्वी एमीनेन्ट्स परिसर – १० मॅट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प असे उभारले जाणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.