वसई : नायगाव पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर शनिवारी सकाळी प्रवासी वाहतूक करणारी बस अडकून पडली होती. त्यामुळे काही काळ पश्चिमेच्या भागात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला. नायगाव पूर्व व पश्चिमेचा परिसर शहराला जोडण्यासाठी उड्डाण पूल तयार करण्यात आला आहे. हा पुल सद्यस्थितीत केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी असून अवजड वाहनांना या पुलावर बंदी घातली आहे. अवजड वाहने या पुलावरून जाऊ नये यासाठी पुलाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूने लोखंडी उंची मर्यादा कमानी बसविण्यात आल्या होत्या.

मात्र काही दिवसांपूर्वी दोन्ही बाजूच्या उंची मर्यादा कमानी वाहनांच्या धडकेत तुटल्या होत्या. जवळपास आठवडाभर त्या कमानी धोकादायक स्थितीत जागच्या जागी पडून असल्याने अपघाताचा धोका ही वाढला होता. याशिवाय सहजरीत्या आता पूर्व पश्चिम अशी अवजड वाहनांची वाहतूक होत होती. यामुळे पूर्व पश्चिम अशा दोन्ही भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. यासाठी पुन्हा उंची मर्यादा कमानी बसविण्यात याव्यात अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. त्यानुसार एमएमआरडीएने उंची मर्यादा कमानी बसविण्यास सुरुवात केली मात्र तेही काम अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. केवळ पश्चिमेच्या भागात उंची मर्यादा कमान लावली. परंतु उड्डाणपुलाच्या पूर्वेच्या भागात कमान लावण्यात आली नाही. त्यामुळे अनेकदा मोठ्या प्रवासी वाहतूक बसेस, अवजड वाहन चालक यांची फसगत होते त्यामुळे उड्डाणपुलावर मध्येच वाहने अडकून पडू लागली आहेत.

शनिवारी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी प्रवासी वाहतूक बस उड्डाणपुलावर चढली मात्र दुसऱ्या बाजूने उंची मर्यादा कमान असल्याने बस मध्येच अडकली. वाहनचालकाने ती बस पुलावरच वळविण्याचा प्रयत्न करीत असताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूने वाहने अडकून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. जवळपास अर्धा ते पाऊण तास नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला.

सूचना फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ

नायगाव येथे पूर्व पश्चिम वाहतूक करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात हलक्या वाहनांची वाहतूक होत असते. तर, अवजड वाहनांना या पुलावर बंदी घातली आहे. तसेच अवजड वाहनांना रोखण्यासाठी उंची लोखंडी कमानी बसविण्यात आल्या आहेत. पण, पुलाच्या दोन्ही बाजूला सूचना फलक नसल्यामुळे अनेकदा या पुलावर लोखंडी कामानीजवळ अवजड वाहने येऊन अडकतात आणि वाहतूक कोंडी निर्माण होते.