वसई: ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून कार्डिनल रॉबर्ट यांची गुरुवारी २६७वे ‘पोप’ म्हणून निवड झाली. नव्या पोप निविडिचा वसईकर ख्रिस्ती समाजाने आनंद साजरा केला. या निवडीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत चर्चमध्ये विशेष प्रार्थना व कार्यक्रम पार पडणार असल्याचे वसईतील ख्रिास्ती बांधवांनी सांगितले आहे.

पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता नवीन पोप निवडीची प्रक्रिया पार पडली कार्डिनल रॉबर्ट यांची गुरुवारी पार पडली. २६७वे ‘पोप’ म्हणून निवड झाली. त्यांनी ‘पोप लिओ १४वे’ असे घोषित करण्यात आले. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर कॅथोलिक चर्चमध्ये ‘सेदे वाकांते’ (पोपपद रिक्त) स्थिती निर्माण झाली होती. प्रथेप्रमाणे व्हॅटिकनमधील सिस्टीन चॅपलमध्ये ‘कॉन्क्लेव्ह’ नावाने ओळखली जाणारी ही गुप्त निवडणूक पार पडली त्यात पोप लिओ चौदावे यांची नियुक्ती झाली आहे.

वसईच्या धर्मप्रांतात ही मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहत असून वसईच्या धर्मप्रांतात ४५ चर्च आहे. मागील काही दिवसांपासून वसईकर नवीन पोप म्हणून कोणाची निवड केली जाईल याच्या प्रतीक्षेत होते. याशिवाय नवीन पोप लवकरात लवकर निवडला जावा यासाठी प्रार्थना ही केल्या जात होत्या गुरुवारी अखेर नव्या पोपची घोषणा झाली. नवीन पोप लिओ यांची निवड होताच वसईतील ख्रिस्ती बांधवांनी आनंद व्यक्त केला. नवीन पोप हे जगाला व समाजाला नवीन दिशा देतील असा विश्वास या बांधवांनी व्यक्त केला आहे.

पोप लिओ १४ वे यांना खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांची निवड म्हणजे ख्रिस्ती सभेला लाभलेली सुंदर अशी देणगी आहे अशा शब्दांत वसई धर्मप्रांतांचे आर्चबिशप डॉ थॉमस डिसोझा यांनी कौतुक केले आहे. त्यांच्या योजना, धोरणे, संकल्प परमेश्वराच्या मार्गदर्शनाने मार्गी लागावे यासाठी विशेष प्रार्थना ही केली जाणार असल्याचे डिसोझा यांनी दिलेल्या संदेशात सांगितले आहे. नवीन पोप लिओ म्हणजे एक अष्टपैलू नेतृत्व असून अध्यात्मिक व सामाजिक कार्यात ते पारंगत आहे. देवाच्या इच्छेने सामान्य पण असामान्य अशा पोपची निवड झाली असल्याची प्रतिक्रिया वसई धर्मप्रांताचे निवृत्त आर्चबिशप डॉ फेलिक्स मच्याडो यांनी दिली आहे. पोप लिओ जगाच्या कल्याणासाठी व सामाजिक गरजा लक्षात घेऊन चांगले काम करतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जागतिक शांततेसाठी चर्च महत्वाची भूमिका निभावेल – कवी सायमन मार्टिन

पेरू या लॅटीन अमेरिकेतल्या देशात सेवाकार्य केलेले व अमेरिकन नागरिक असलेले पोप लिओ चौदावे यांची निवड ही आज जग विद्वेषाच्या टोकावर उभं असताना शुभसुचक घटना आहे . ते सत्तर वर्षांचे म्हणजे तुलनेने तरूण आहेत . तिसऱ्या जगात कार्य केल्यामुळे जगाला भेडसावणाऱ्या कळीच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे . जगभरात बोकाळलेला अतिरिक्त भोगवाद , श्रद्धाहिनता , समतोल व विवेकी नेतृत्वाचा अभाव , विचारसरणींचा अंत आणि माणसा माणसातील तुटलेपणामुळे आपण निर्णायकी अवस्था अनुभवत आहोत . याच काळात वैश्विक चर्च उत्तम मार्गदर्शन करून जगात शांती प्रस्थापीत करण्यासाठी प्रयत्न करू शकते . आज चालू असलेल्या युद्धांनी जो नरसंहार चालवलेला आहे त्यामुळे संपूर्ण विश्व दुःखी आहे .

सर्वधर्म स्नेहभाव हा चर्चचा महत्वाचा कार्यक्रम आहे . माणूस अंतीम असून अन्य बाबी गौण आहेत म्हणून माणूस वाचवण्याची जबाबदारी महत्वाची आहे . पोप लिओ यांच अमेरिकन नागरिक असणं हे देखील आश्वासक आहे . जागतिक सलोख्यासाठी जग आज अमेरिकेकडे आशेने बघते आहे . अमेरिकेने त्यांचा उदारमतवाद आणि कल्याणकारी कार्यक्रम थांबवला तर जगाला फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल . या सर्व परिस्थितीत पोप लिओ उत्तम मार्गदर्शकाची भूमिका निभावू शकतातपोप फ्रान्सिस यांना आपल्या पंतप्रधानानी भारत भेटीचं निमंत्रण दिलेलं होतं . पोपच्या प्रकृती अस्वस्थामुळे ते शक्य झालं नाही पण नवीन पोपने भारताला भेट द्यावी कारण सध्याच्या जगात भारतच पूर्ण जगाला आपल्या उदार वारशाद्वारे वेगळा दृष्टीकोन देऊ शकतो असे मत ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी व्यक्त केले आहे.