भाईंदर : मिरा रोड येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यात ५० हून अधिक वाहनांची तोडफोड ही करण्यात आली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.काशिमिरा येथील डाचकुलपाडा भागात राहणाऱ्या एका शाळकरी मुलीची एका तरुणाने छेड काढली होती. याबाबत मुलीच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, या घटनेचा राग धरून आरोपी तरुणाने मंगळवारी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत दोन गटांत तुफान हाणामारी झाली. काहींनी परिसरात उभ्या असलेल्या पन्नासहून अधिक रिक्षांच्या काचा फोडल्या. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.ही घटना केवळ मुलीची छेड काढण्यापुरती मर्यादित नसून, त्यामागे धार्मिक वाद असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. काशिगाव पोलिसांनी या घटनेनंतर जवळपास पन्नासहून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, हा संपूर्ण वाद वाहनतळाच्या जागेवरून निर्माण झाला असल्याचा दावा काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोकडगावकर यांनी केला आहे. घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, या भागात अमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.