वसई: वसई विरार मध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका शहरातील औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. पूरस्थिती मुळे वसईतील अनेक कारखान्यात पाणी जाऊन यंत्रसामग्री, कच्चा माल, तयार करण्यात आलेला माल व इतर साहित्य पूर्णतः पाण्यात गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
वसईच्या भागात नवघर, वालीव, सातीवली ,रेंज ऑफिस, गोलानी, भोयदापाडा, यासह इतर विविध ठिकाणच्या भागात औद्योगिक वसाहती आहेत. यात अडीच ते तीन हजाराहून अधिक लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग कारखाने आहेत. मागील चार दिवसांपासून वसई विरार भागात पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे सखल भागासह विविध ठिकाणच्या भागात पावसाचे पाणी साचले आहे. हे पावसाचे पाणी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात घुसल्याने कारखान्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.भोयदा पाडा, वालीव यासह रेंज ऑफिस आदी ठिकाणचे कारखान्यात जवळपास चार ते पाच फूट पाणी इतके पाणी शिरले असल्याचे येथील उद्योजकांनी सांगितले आहे.
पुराच्या पाण्यात कारखान्यात असलेल्या सुरू असलेल्या यंत्रणाही बंद पडल्या आहेत. तर कच्चा मालदेखील भिजला आहे. माल तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या महागड्या यंत्रसामग्री या पाण्यात भिजून नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने ठप्प झाली. या पाण्याचा फटका मोठ्या प्रमाणात लहान उद्योजकांना बसला आहे.
पाणी निचरा होण्याचे मार्गच नसल्याने मागील काही वर्षांपासून विविध ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीत पाणी साचून राहते त्यामुळे उद्योजकांना, कामगार वर्ग यांना फटका बसतो असे गोवालीस इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अशोक ग्रोवर यांनी सांगितले आहे.