वसई-विरारमध्ये उघडी गटारे धोकादायक

विरार : रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वसई-विरार परिसरात अनेक ठिकाणी पूरस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यात पावसाने अनेक गटारावरील झाकणे वाहून गेली तर काही तुटली आहेत.  ही गटारे अधिक धोकादायक बनली  आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाआधी पालिकेने शहरातील गटारांची दुरुस्ती केल्याचे दावे पहिल्याच मुसळधार पावसाने वाहून गेले आहे. रविवारी झालेल्या पावसात अनेक गटारांची झाकणे गायब झाली आहेत. तर अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने तुटली आहेत. तर काही ठिकाणी गटारांचे चेंबर वाहून गेले आहेत.  यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून पालिकेने ही उघडी, तुटलेली गटारे तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी होत आहे.

वसई विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वसई जलमय होत असते. शहरातील रस्त्यांना अक्षरश: तलावाचे स्वरूप येत असते. त्यामुळे रस्ता कुठला आणि गटार कुठले हा फरक कळत नाही. यातील सर्वात मोठा धोका उघडय़ा गटारांचा निर्माण होतो. नुकताच बिलालपाडा येथे आठ वर्षांचा मुलगा वाहून गेला आहे. अजूनही त्याचा कोणता थांगपत्ता लागला नाही. दरवर्षी या उघडय़ा गटारांमुळे अनेक जण अपघाताचे बळी ठरत आहेत. तरीसुद्धा महापालिका उघडय़ा गटारांच्या बाबतीत सतर्कता बाळगत नसल्याचे दिसून आले आहे.  अजूनही अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचून आहे. सर्वच गटारे तुडुंब भरून वाहत आहेत. अशावेळी उघडी गटारे मृत्यूचे सापळे बनत आहेत. नालासोपारा पूर्व सेन्ट्रल पार्क रस्ता पूर्ण दोन दिवस पाण्याखाली होता यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटांवर झाकणे नसल्याने नागरिकांनी त्यात काठय़ा रोवून नागरिकांची सुरक्षा केली.

महापालिका क्षेत्रात अनेक गटारांची कामे अर्धवट पडली आहेत, त्यात गटारावर आरसीसी बांधकाम करणे, नाल्यांचे रुंदीकरण करणे, नाल्यांची खोली वाढवणे अशी अनेक कामे अर्धवट पडून आहेत, अचानक सुरु झालेल्या पावसाने सर्वांचीच दैना उडवली आहे. नालासोपारा अग्रवाल, लिंक रोड, वसंत नगरी, डी मार्ट, तुळींज अलका पुरी प्रगती नगर, ओसवाल नगरी  या जागांवर नाल्याचे काम सुरु करण्यात आले होते पण अजूनही हे काम पूर्ण झाले नाही आहे. दर वर्षी वसई विरार महापालिका गटार निर्मिती, दुरुस्तीवर ५० कोटी खर्च करते. पण या वर्षी करोनामुळे या खर्चावर कपात आली आहे. परंतु अजूनही शहरातील शेकडो गटारे उघडी आहेत. अनेक गटारांची झाकणे जीर्ण होऊन फुटली आहेत, तर अनेक गटारांना झाकणे कधीच लागली नाहीत. तर अनेक परिसरातील गटाराची झाकणे उघडी किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्थानिक नागरिकांनी अपघात होऊ नये म्हणून त्यावर लाकडी फळ्या, अथवा बांबू टाकत आहेत. कोटय़वधीची तरतूद असूनसुद्धा अजूनही पालिकेने गटारांची कामे केली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील गटारांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. लवकरच सर्व गटारांची कामे पूर्ण केली जातील.

-राजेंद्र लाड,  मुख्य अभियंता बांधकाम विभाग, वसई-विरार महानगर पालिका

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous open gutters in vasai virar ssh