वसई:- शहराच्या वाढत्या नागरिकरणा सोबतच पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. विशेषतः विविध ठिकाणच्या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून धोकादायक पध्दतीने वाहतूक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागा कडून सेवा दिली जात आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. शहाराच्या वाढत्या लोकसंख्येच्या नुसार बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही प्रचंड वाढू लागली आहे.

सकाळ व संध्याकाळच्या सुमारास चाकरमानी प्रवाशांची मोठी गर्दी बस मध्ये असते. पंरतु बस मध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. लोकल गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसारखी गर्दी आता पालिकेच्या बस मध्ये होत असल्याने अनेकदा एकाच बाजूने झुकलेली असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यावर पालिकेच्या परिवहन विभागामार्फत कोणतेही नियंत्रण होत नसल्याने नागरिकांना धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. सर्वाधिक गर्दी सातिवली फाटा, नालासोपारा, वसई फाटा, विरार, भोयदापाडा ते नायगाव , नायगाव – बापाणे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या बसेस मध्ये दिसून येत आहे. काही प्रवासी लोकलमध्ये ज्या प्रमाणे लटकून प्रवास होतो तसा प्रवास करू लागले आहेत. या धोकादायक प्रवासामुळे  बसचा एका बाजूला तोल जाऊन जर बस कलंडली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे. विशेषतः रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचे हादरे बसला देखील बसतात.त्यामुळे सुद्धा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन बसेसची संख्या वाढविण्यात यावी जेणेकरून येणारा ताण हा कमी होईल असे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे.

नियंत्रणासाठी परिवहन विभागाचे प्रयत्न

पालिकेच्या परिवहन विभागात २५, ३१, आणि ४१ आसनी बसेस आहेत. दिवसाला सरासरी २२०० फेऱ्या बसेसच्या होत आहेत.  सकाळ व संध्याकाळच्या सुमारास वसई फाटा, सातिवली फाटा, विरार व नालासोपारा येथील मार्गावर परिवहन बसने प्रवास करणाऱ्या  प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यासाठी सकाळी चार तास व संध्याकाळी चार तास या ठिकाणी अतिरिक्त बसेसच्या फेऱ्या दिल्या जात आहेत. बसेसवर जास्त ताण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.

रस्त्यांच्या दुर्दशा व वाहतूक कोंडीचा फटका

वसई विरार शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्याचा फटका परिवहन सेवेच्या बसेसला बसू लागला आहे. दररोज १२ ते १५ बसेस मध्ये तांत्रिक बिघाड होत आहे. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे फेऱ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. तर नुकताच पालिकेने ई बस घेतल्या आहेत. मात्र या ई बस अतिखड्ड्यांच्या ठिकाणी चालविता येत नसल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बस संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न

शहरातील वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता बस ची संख्या वाढविण्याचे काम पालिकेकडून सुरू केले आहे. विशेषतः  पालिकेने ई बस सेवा पुरविण्यावर भर दिला आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ४० ई बस आहेत तर केंद्र शासनाच्या पंतप्रधान अनुदान योजनेतून आणखीन १०० ई बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असे परिवहन विभागाचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले आहे.