संशयास्पद मृत्यूचा तपास आणि पुराव्यांचे पाठबळ देणार
सुहास बिऱ्हाडे
वसई : प्रत्येक संशयास्पद मृत्यूंचा तपास, हत्या प्रकरणात भक्कम तांत्रिक पुरावे आणि हत्यांच्या तपासात तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिका आणि इंग्लंडच्या धर्तीवर मीरा-भाईदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात सदोष मनुष्यवध शाखा तयार करण्यात आली आहे. अशाप्रकारची शाखा असणारे हे देशातील पहिले पोलीस आयुक्तालय ठरले आहे. यामुळे हत्या करून अपघाती मृत्यू दाखविण्याचे प्रकार रोखता येतील तसेच आरोपी न्यायालयातून पुराव्याअभावी सुटू शकणार नाही.
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना ऑक्टोबर २०२० रोजी झाली. पहिले आयुक्त म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली. दाते हे पोलीस दलात आमूलाग्र बदल करून नवनवीन उपक्रम राबवत असतात. त्यांनी आयुक्तालयात सदोष मनुष्यवध शाखा तयार केली आहे. संशयास्पद अपमृत्यूंचा तपास आणि हत्यांच्या प्रकरणात पुराव्यांचे पाठबळ मिळवून देण्याचे काम ही शाखा करणार आहे. दाते अमेरिका आणि इंग्लंडमध्ये असताना त्यांनी तिकडच्या पोलिसांची कार्यपद्धती पाहिली आणि त्या धर्तीवर मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात ही शाखा सुरू केली. संपूर्ण देशात अशा प्रकारचा हा पाहिलीच शाखा आहे.
स्थानिक पोलिसांना तपासात मार्गदर्शन
दोन प्रकारचे मृत्यू होतात. एक म्हणजे अपघाती आणि दुसरी म्हणजे हत्या. अनेक अपघाती आणि नैसर्गिक मृत्यू हे संशयास्पद असतात. त्यांची केवळ अपमृत्यू म्हणून नोंद होते. सदोष मनुष्यवध शाखा अशा अपमृत्यूंचा तपास करणार आहे. यामुळे हत्या दडविण्याचा प्रकार बंद होऊ शकणार आहे. हत्या प्रकरणात स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा तपास करतात. शहरातील हत्यांच्या प्रमुख प्रकरणात सदोष मनुष्यवध शाखा तपासात मार्गदर्शन करणार आहे. तपासी अधिकाऱ्याला प्रत्येक २० दिवसांनी बोलावून आतापर्यंत केलेल्या तपासाचा आढावा घेऊन पुढील मार्गदर्शन केले जाणार आहे. शवविच्छेदन कसे करावे, हत्येनंतर शरीरातील बदल कसे ओळखावे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय तांत्रिक तपास करावा हे या शाखेमार्फत सांगितले जाणार आहे.
हत्या प्रकरणात अनेकदा ठोस पुरेसे पुरावे मिळत नाही. हत्या प्रकरणात न्यायालयात दोष सिद्ध करण्यासाठी सबळ पुराव्यांची आवश्यकता असते. त्या अभावी आरोपी सुटतात त्यासाठी सदोष मनुष्यवध शाखा तांत्रिक, न्यावैद्यक, जैविक पुरावे गोळा करण्याचे काम करणार आहे. त्यासाठी या शाखेतील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. न्यायालयातून पुराव्याअभावी सुटलेल्या १० प्रकरणांचा अभ्यास दरवर्षी करून त्यातील त्रुटी तपासल्या जातील जेणेकरून पुढील प्रकरणातील तपासात त्याची पुनरावृत्ती टळेल, असा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. महेश पाटील यांनी दिली.
सदोष मनुष्यवध शाखेमुळे हत्यांच्या तपासात भक्कम पुरावे गोळा करता येतील आणि न्यायालयात आरोपींना शिक्षा होणार आहे. तपासी अधिकाऱ्यांनी सर्व प्रकारचे पाठबळ, मार्गदर्शन ही शाखा करणार आहे, अमेरिका आणि इंग्लडमधील पोलिसांच्या धर्तीवर ही शाखा सुरू करण्यात आलेली आहे
–सदानंद दाते, पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई-विरार