भाईंदर : गेल्या पाच महिन्यांपासून परिवहन सेवेचे योग्य धोरण निश्चित होत नसल्यामुळे नवी निविदा प्रक्रिया राबवण्याकरिता विलंब होत आहे. तर सध्या तात्पुरत्या स्वरूपात परिवहन सेवा देण्यात आलेल्या कंत्राटदाराला आर्थिक फायदा पोहचवण्याकरिता प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचे आरोप करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा २००५ रोजी अस्तित्वात आली. ही सेवा खासगी तत्त्वावर चालवण्यात येत असून याकरिता निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटदाराची निवड करण्यात येते. मात्र प्रशासनामार्फत वेळोवेळी  ठरवण्यात आलेल्या अनिश्चित धोरणामुळे महानगरपालिकेला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. यात दोन वर्षांपूर्वी हा ठेका ‘भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन’ या कंपनीला  दिला होता. यात पालिकेच्या सेवेतील एकूण ७४ बसगाडया कंत्राटदाराला सोपवण्यात आल्या होत्या. तसेच ठेकेदारास प्रति कि.मी. ४२ रुपये याप्रमाणे मोबदला देण्यात येत होता. मात्र कंत्राटदार आणि प्रशासनात वाद सुरू झाल्याने तोदेखील रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात परिवहन सेवा सुरू ठेवण्याकरिता ‘महालक्ष्मी’ या कंत्राटदाराकडे ती सोपवण्यात आली आहे. तसेच आता नवीन सुरळीत धोरण ठरवून, निश्चित करून पुन्हा नव्याने कंत्राट देण्याकरिता गेल्या महिन्यात आयोजित केलेल्या महासभेपुढे विषय आण्यात आला होता. मात्र महासभेत विषय येताच यात सत्ताधारी भाजप पक्षात दुमत निर्माण झाले असल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे हे धोरण महासभेत न ठरवता एका सर्व पक्षातील पदाधिकाऱ्याची समिती बनवून ठरवण्याचा प्रस्ताव महापौर ज्योस्त्ना हासनाळे यांनी मांडला होता. मात्र गेल्या महिन्याभरापासून या समितीची बैठक झाली नसल्यामुळे आद्यपही धोरण निश्चित करण्यात आलेले नाही. तसेच गेल्या पाच महिन्यांपासून विविध स्वरूपाच्या अडचणी निर्माण करून तात्पुरत्या स्वरूपात परिवहन कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदाराला आर्थिक फायदा पोहोचवण्याकरिता कट रचला जात असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गेल्या मंगळवारी परिवहन सेवेचे धोरण निश्चित करण्याकरिता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र काही कारणामुळे ती होऊ शकली नाही. त्यामुळे या आठवडय़ात पुन्हा बैठक आयोजित करून धोरण निश्चित करण्यात येणार आहे व त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून नव्या कंत्राटदाराची निवड करण्यात येईल.

– अजित मुठे, उपायुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका