वसई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहरात विविध ठिकाणी ग्राहकपेठा उभारण्यात आल्या आहेत. या ग्राहकपेठांमध्ये दिवाळीच्या सजावटीचे सामान, फराळाचे पदार्थ, फटाके, सौंदर्यप्रसाधने असे विविध प्रकारच्या सामानाची विक्री करणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. पण, गेल्या दोन ते तीन वर्षात या ग्राहकपेठांमध्ये स्वावलंबनाकडे वाटचाल करणाऱ्या महिला उद्योजिका, लघुउद्योजिका, महिला बचत गटाचा तसेच संस्थांचा भाग असलेल्या महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर या ग्राहकपेठांमुळे महिला उद्योजिकांनाही आर्थिक बळ प्राप्त झाले आहे.

दिवाळी सणानिमित्त वसई विरार शहरात सजावटीचे सामान, रांगोळ्या, पणत्या, फराळ अशा विविध प्रकारच्या सामानाने बाजारपेठा सजल्या आहेत. तर दुसरीकडे या सामानाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दीही उसळू लागली आहे. तर ग्राहकांना सहज दिवाळीचे सामान उपलब्ध व्हावे म्हणून मोठमोठाली दुकाने, लहान-मोठे फेरीवाले यांच्यासह शहरी भागात ग्राहकपेठा उभारण्याची पद्धत गेल्या काही वर्षात रूढ झाली आहे. वसई विरार शहरात मुख्य बाजारपेठा, मोकळी मैदाने, बसथांबे, रेल्वेस्थानक तसेच मुख्य वर्दळीच्या रस्त्यांलगत सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच महापालिका प्रशासनाकडून ग्राहकपेठा उभारण्यात आल्या आहेत.

या ग्राहकपेठांमध्ये दिवाळीच्या सजावटीसाठी लागणारे सामान, फराळाचे पदार्थ, साड्या, सौंदर्यप्रसाधने, घरगुती उटणे, फटाके अशा विविध प्रकारच्या सामानाची विक्री करणारे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. तर या गेल्या काही काळात घरगुती लघुद्योग असणाऱ्या महिला, महिला उद्योजिका, महिला बचत गटाचा तसेच संस्थांचा भाग असलेल्या महिलांचा सहभाग या ग्राहकपेठांमध्ये वाढला आहे. तर, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडूनही महिला उद्योजिकांच्या स्टॉल्सना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त उभारण्यात आलेले हे स्टॉल्स महिलांसाठी रॊजगाराची संधी आणि अर्थार्जनाचे एक महत्त्वाचे साधन ठरत आहेत.

गेल्या बऱ्याच वर्षांपासून आम्ही वसईच्या ग्राहकपेठांमध्ये फटाक्यांचा स्टॉल लावत आहोत. पूर्वी हा स्टॉल बाबा किंवा भाऊ पाहायचे. पण, यंदा आम्ही महिलांनी मिळून फटक्यांची विक्री करायचे ठरवले आणि त्यानुसार आम्ही हा स्टॉल उभारला असल्याचे फटाके विक्रेत्या साक्षी डिचोलकर यांनी सांगितले.

ग्रामीण महिलांचा वाढता सहभाग

वसई विरारच्या शहरी भागात उभारण्यात येणाऱ्या ग्राहकपेठांमध्ये ग्रामीण महिला उद्योजिकाही मोठ्या संख्येने सामील होऊ लागल्या आहेत. घरगुती उटणे, अगरबत्त्या, आकाशकंदील तसेच फराळाचे पदार्थ अशा विविध प्रकारच्या सामानाची विक्री करताना त्या दिसून येत आहेत. तर ग्राहकांकडूनही या महिला उद्योजिकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.