विरार : वसई विरार शहरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा फटका वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यालाही बसला असून किल्ल्याचा सागरी दरवाजा आज मंगळवारी निखळला आहे. यामुळे ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या भव्य दरवाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

वसईच्या पश्चिमेला खाडी किनारी चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची साक्ष असलेला ऐतिहासिक वसईचा किल्ला आहे. वसईत पोर्तुगीज सत्ता असताना या किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्यात आले होते. सध्या देखभाली अभावी किल्ल्याची दुरवस्था झाली असून यामुळे किल्ल्यातील ऐतिहासिक ठेव्यांचे मोठे नुकसान होत आहे. मंगळवारी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला आहे. यामुळे गेली अनेक शतके किल्ल्याचे सागरी प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भक्कम दरवाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. काही ठिकणी डागडुजी आणि इमारतींचे जतन करण्याची कामे सुरु आहेत. मात्र पुरेशा सुरक्षेअभावी गेल्या काही वर्षात किल्ल्यातील अनेक ऐतिहासिक पुरावे, शिल्प आदींची चोरी झाली आहे. या सागरी दरवाजाचीही चोरी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची मागणी किल्ले प्रेमींकडून करण्यात आली आहे.

ऐतिहासिक वारशाचे जतन होण्याची गरज

पोर्तुगीज काळात उभारण्यात आलेल्या या किल्ल्यात वास्तु कलेचा उत्तम नमुना असलेली विविध चर्च आणि इतर ऐतिहासिक इमारती आहेत. तसेच मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी आप्पांनी उभारलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिर आणि नागेश्वर तीर्थ ही मंदिरे ही आहेत. हा किल्ला ११० एकर इतक्या विशाल परिसरात पसरलेला आहे.

वसईचा किल्ला गेल्या अनेक वर्षांपासून पुरेशी देखभाल तसेच पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यामागची उदासीनता यामुळे या किल्ल्याचे मोठे नुकसान होत आहे. हा किल्ला म्हणजे वसई तालुक्यातीलच नव्हे तर पालघर जिल्ह्यातील एक महत्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. आज दरवाजा निखळला आहे उद्या आणखीन काही वास्तुंचे नुकसान होऊ शकते यासाठी तातडीने ऐतिहासिक वारशाचे जतन होण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया वसईतील सामाजिक कार्यकर्ते व किल्लेप्रेमीं नितीन म्हात्रे यांनी व्यक्त केली.

पावसामुळे दरवाजा निखळला आहे. पाऊस सुरू असून त्या ठिकाणी किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेल्या सुरक्षा रक्षका कडून लक्ष ठेवले जाणार आहे.  उद्या क्रेनच्या साहाय्याने हा दरवाजा उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवला जाईल –कैलाश शिंदे, अधीक्षक पुरातत्त्व विभाग वसई