वसई: वसईत वज्रेश्वरी शिरसाड रस्त्यावर छुप्या मार्गाने होणारी खैर तस्करी वनविकास मंडळाने उघड केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वसई पूर्वेच्या शिरसाड – वज्रेश्वरी रस्त्यावरून छुप्या मार्गाने लाकडांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार शिरसाड, मांडवी व गणेशपुरी रेंज मधील अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार करून गस्त ठेवण्यात आली होती.
याच दरम्यान एक संशयास्पद वाहन दिसून आले. त्यांची झडती घेतली असता त्यातून खैर लाकडांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. यात ५९ नग खैराची ओंडके जप्त केली. तसेच या पुढील चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा धानिवबाग येथेही खैर तस्करीच्या तीन वाहनांवर धाड टाकून ४९५ नग खैर जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत खैर तस्कर सुनील यादव व गीतेश गोवारी यांना अटक करून त्यांच्याकडून एकूण ५५४ नग खैर, चार वाहने असा एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वनविकास शिरसाड मांडवी व गणेशपुरी रेंज मधील अधिकारी वैभव जाधव, शिरसाड वनपरिक्षेत्र अधिकारी कृष्णा सानप, वनपाल अभिजीत सोनवणे, महेंद्र सोलंकी, रंगराव चव्हाण आदींच्या पथकाने केली. पुढील तपास वनविकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक सारिका जगताप, सहाय्यक व्यवस्थापक जयश्री केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल चिंबीपाडा पोपट खोसरे (अति) व सहकारी अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.