भाईंदर : गणेशोत्सवानिमित्त बाजारात विविध साहित्य विक्रीसाठी आले असून यात कृत्रिम केळीच्या पानांचाही समावेश आहे. यामुळे बाजारात नैसर्गिक पाने विक्रीसाठी बसलेल्या शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करताना पारंपरिक साहित्याऐवजी बनावट व कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पूर्वी केवळ सजावटीसाठी कृत्रिम फुले-फळे वापरली जात होती. मात्र शहरी भागात पारंपरिक गोष्टींची कमतरता भासत असल्यामुळे आता ही उणीव देखील कृत्रिम वस्तूंमधून पूर्ण केली जात आहे.

यात बाजारात कृत्रिम केळीची पानेही आल्याचे दिसून येत आहे. ही पाने हुबेहूब खऱ्या केळीच्या पानांसारखी असून हातात घेतल्यानंतरसुद्धा त्यातील फारसा फरक जाणवत नाही. प्रामुख्याने केळीची पाने गणेशाला नैवेद्य ठेवताना तसेच सत्यनारायणाच्या पूजेनंतर पाहुण्यांना भोजन देताना पंगतीत वापरली जातात. त्यामुळे या काळात या पानांची विक्री करण्यासाठी आसपासच्या भागातील बागायतदार शेतकरी बाजारात बसल्याचे दिसते. मात्र आता कृत्रिम पाने उपलब्ध झाल्यामुळे खरेदीदारांचा कल त्यांच्याकडे झुकत आहे.

या कृत्रिम केळीच्या पानांची किंमत नैसर्गिक पानांच्या तुलनेत दहापट (प्रति पान ५० रुपये) आहे. तरीही ही पाने सहज धुवून पुन्हा वापरता येतात, फाटण्याची शक्यता कमी असते आणि घरी ठेवून कधीही आवश्यकतेनुसार वापरता येतात, त्यामुळे खरेदीदार ती पसंत करत असल्याचे दिसते. परंतु, केळीच्या पानांचा संबंध हा संस्कृती व परंपरेशी असल्याने त्याऐवजी कृत्रिम पाने वापरणे चुकीचे आहे, असे नैसर्गिक पानांची विक्री करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे.

बाजारात विद्युत समई :

यंदा बाजारात विद्युत समईदेखील विक्रीला आली आहे. या समईमध्ये विद्युत दिवे बसवले असून ते हुबेहूब ज्वलंत दिव्यासारखे दिसतात. परंपरेनुसार गणेशमूर्तीसमोर सतत दिवा जळत ठेवण्याची प्रथा आहे. यासाठी तेलाचा वापर होतो. मात्र आता बाजारात विद्युत दिवे उपलब्ध झाल्यामुळे ते खरेदी करण्याकडेही खरेदीदारांचा कल दिसून येत आहे.