भाईंदर:- मिरा रोड येथील पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना शासकीय विमा योजनांची मान्यता मिळण्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागत आहे. परिणामी उपचाराविना रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
मिरा रोड येथील नाट्यगृहाशेजारी महापालिकेच्या सुविधा भूखंडावर ‘इंदिराबाई बाबुराव सरनाईक’ हे पहिले कॅशलेस रुग्णालय उभारण्यात आले आहे.या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना मोफत सेवा पुरवण्यात येत आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन प्लॅटिनम हॉस्पिटल ग्रुपकडे देण्यात आले असून, गेल्या काही महिन्यांत अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.
मात्र अलीकडे या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये रुग्णांकडून कागदापत्रे जमा केल्यानंतर ही शासकीय विमा योजनेची मंजुरी मिळण्यास मोठा कालावधी लागत आहे. परिणामी वेळेत उपचारा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.काही प्रकरणात अनेकांचा जीव गेल्याचे देखील आरोप होत आहेत. त्यामुळे सदर रुग्णालयाच्या व्यवस्थापनेकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे,अशी मागणी भाजप पक्षाचे पदाधिकारी रवि व्यास यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांकडे केली आहे. तर काही मोजक्याच प्रकरणात शासनाची मंजुरी मिळण्यास प्रतीक्षा करावी लागत असल्याचा दावा रुग्णालय व्यवस्थापनांकडून करण्यात आला आहे.
मोजक्याच आजारावर उपचार :-
नव्याने सुरु झालेल्या या रुग्णालयात काही मोजक्याच आजारावर उपचार केले जात आहे.तर हृदय व किडनी सारख्या विकरासाठी रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना पुढे मुंबईतील शासनकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. परिणामी मुख्य उपचाराविना काही दिवस वाया जात असल्यामुळे रुग्णांच्या कुटूंबीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.