लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : मधुजाल (हनी ट्रॅप) लावून एका गुजराती व्यापार्‍याचे अपहरण आणि बलात्काराची धमकी देत खंडणी उकळल्याचा प्रकार मिरारोड मध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात ४ तरुणींसह पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. यातील एका कॉल गर्ल असलेल्या महिलेने व्यापार्‍याचा बदला घेण्यासाठी ही योजना बनवल्याचे तपासात उघड झाले आहे.

मिरारोडमध्ये राहणार्‍या ६० वर्षीय व्यापार्‍याला १६ मे रोजी पिंकी नावाच्या तरुणीने कॉल करून कामाची गरज असल्याचे सांगितले. यानंतर पांडव पिंकीला शांती गार्डन येथे भेटले. यावेळी पिंकीने व्यापार्‍याशी गोड बोलून मैत्री केली. यानंतर पिंकीने ठरलेल्या योजनेनुसार २१ मे रोजी तिने व्यापार्‍याला मिरा रोड येथील हिल टॉप हॉटेलमध्ये बोलावले. तिने टाकेलल्या जाळ्यात व्यापारी अलगद सापडला. पिंकीने रुममध्ये जाताच व्यापार्‍याचे मोबाईलमधून चित्रिकरण करायला सुरवात केली. व्यापार्‍याला संशय आल्याने तो रूममधून निघाला.

आणखी वाचा-नालासोपाऱ्यात कारखान्यात थिनर टँक स्फोट, कामगार जखमी

१ लाखांची खंडणी आणि बेदम मारहाण

मात्र हॉटेल बाहेर पडताच पिंकी आणि अन्य एका तरुनीने व्यापार्‍याला यांना एका रिक्षात बसवून गोराईला नेले. तेथे त्याच्या साथादीराने या व्यापार्‍याला बेदम मारहाण केली. १ लाख रुपये दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करून अशी धमकी दिली. पैसे काढण्यासाठी आरोपींनी व्यापार्‍याला एका एटीएममध्ये नेले. मात्र पैसे निघाले नाही. त्यामुळे त्याच्या खिशातील ५ हजार काढून घेण्यात आले. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून तपास सुरू केला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिजित लांडे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला आणि अवघ्या ५ तासात या टोळीला अटक केली. त्यामध्ये सोनाली महाले (२८) निशा गायकवाड (४५), दिपा प्रजापती (३८) दर्शना गायकवाड (२२) आणि मलिक फक्की (२४) या पाच जणांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे, पोलीस उपनिरीक्षक किरण बदघाणे, ओमप्रकाश पाटील आदींच्या पथकाने जलद तपास करून या टोळीला अटक केली.

आणखी वाचा-भाईंदर : बारावीत ७८% मिळवूनही विद्यार्थिनीची आत्महत्या; ९० टक्के न मिळाल्याने होती निराश

…म्हणून कॉल गर्लने घेतला बदला

याबाबतम माहिती देताना काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, या योजनेची सुत्रधार निशा नावाची कॉल गर्ल आहे. फिर्यादी व्यापारी मागील १५ वर्षांपासून तिच्याकडे जात होता. मात्र एकदा फिर्यांदीने तिला पैसे दिले नाहीत तसेच तिचा अपमान केला होता. त्यामुळे यांचा बदला घेण्यासाठी तिने ही योजना आखली. या टोळीने अशाप्रकारे कुणाची फसवणूक केली आहे का त्याचा पोलीस शोध घेत आहे. आज दुपारी आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.