वसई: इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला. नायगाव पश्चिमेच्या नवकार संकुलात मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अन्विका प्रजापती असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. घडलेला प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

नायगाव पूर्वेच्या भागात नवकार इमारत आहे. या इमारतीच्या फेज वनमधील ए ३ विंगमध्ये बाराव्या मजल्यावर राहत असलेल्या प्रजापती कुटुंबियांच्या घरी मंगळवारी रात्रीच्या सुमारास अन्विका आणि तिची आई आली होती. याच दरम्यान इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून खाली पडून अन्विका प्रजापती (४) हिचा मृत्यू झाला होता. या घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

ही घडलेली घटना घराच्या समोरच लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अन्विकाची आई घराबाहेर जात असताना तिला चप्पल घालण्यासाठी स्टॅण्डवर बसविले होते. इतक्यात अन्विका तेथील खिडकीवर बसण्यासाठी गेली, मात्र तिचा मागे तोल जाऊन काही समजण्याच्या आत खिडकीतून खाली पडली असल्याचे या सीसीटीव्हीमधून समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. अन्विकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी वसई महापालिकेच्या सर डी.एम. पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

२१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू (२३ एप्रिल २०२४)

विरारमध्ये एप्रिल महिन्यात अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. विरार पश्चिमेच्या बोळींज येथे जॉय विले नावाचे निवासी संकुल आहे. या संकुलात पिनॅकल नावाची इमारत आहे. या इमारतीत २१ व्या मजल्यावरील २१०४ या सदनिकेत विकी सदाने आणि पूजा सदाने हे दाम्पत्य राहतात. त्यांंना ७ महिन्यांचे बाळ होते. बुधवार २३ एप्रिल रोजी पूजा सदाने या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या. मात्र खिडकीजवळ पाणी पडल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला. यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ २१ व्या मजल्यावरून खाली पडले. या दुर्घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला होता.