वसई : ऐतिहासिक वसईच्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत सुमारे ४५० मीटर संरक्षक जाळ्या लावण्यात येत आहेत. या जाळ्या लावल्यानंतर संध्याकाळी ७ नंतर किल्ल्यात प्रवेश बंदी घातली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई किल्ल्याचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून किल्ल्याच्या वास्तूला हुल्लडाबाजांमुळे धोका निर्माण झाला आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूने संरक्षण नाही. त्यामुळे किल्ल्यावर रात्री येणाऱ्या मद्यपी, पर्यटक यांवर कोणतीही बंधने नसल्याने सर्रासपणे प्रवेश करतात. किल्ल्यात अनेक गैरप्रकार होत असतात. यामुळे किल्ल्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वसईचा किल्ला हा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो.

हेही वाचा : विरारचा ग्लोबल सिटी परिसर अजूनही तहानलेला

किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी तसेच किल्ला अधिक सुरक्षित करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने या भागात संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ला परिसरातील सुमारे ४५० मीटरपर्यंत या संरक्षक जाळ्या लावण्यात येत आहेत. त्या कामाची सुरवात करण्यात आली आहे. यासाठी ७० लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. या संरक्षक जाळ्यामुळे किल्ल्यात होणारे गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे. याशिवाय रात्री काही जण किल्ल्यात घुसतात त्यांच्यावर निर्बंध घालता येणार आहेत.

जाळ्या लावल्यानंतर विशिष्ट वेळेतच पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश करता येणार आहे. संध्याकाळी ७ नंतर किल्ल्यात प्रवेशास बंदी घातली जाणार आहे असे पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक कैलास शिंदे यांनी सांगितले आहे. किल्ला संरक्षित करण्याबरोबरच त्याचे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किल्ल्याची नियमित स्वच्छता, दुरवस्था झालेल्या पुरातन वास्तूची डागडुजी करणे अशी विविध कामे मार्गी लावण्यात येत आहेत असे पुरातत्त्व विभागाने सांगितले.

हेही वाचा : वसई: पालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट अपूर्ण, यंदाच्या वर्षी ३३८ कोटींची मालमत्ता कर वसुली

वसईच्या किल्ल्याचे महत्व

व्यापाराच्या दृष्टीने वसईचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी सन १५३६ मध्ये वसईचा किल्ला बांधला होता. किल्ल्याला समुद्राच्या पाण्याने वेढले असून तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला किल्ला १०९ एकर जागेत उभा आहे. किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. किल्ल्याला चारही बाजूंनी ३० फुटांची तटबंदी आहे.वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांनी केलेल्या मोहिमेमुळे ऐतिहासिक ठेवा म्हणून प्रसिद्ध झाला आहे.

दुर्गप्रेमींकडून संवर्धनासाठी प्रयत्न

ऐतिहासिक ठेव्याची जपणूक व्हावी यासाठी वसई किल्ल्यात सातत्याने स्वच्छता मोहिमा राबवून दुर्गप्रेमींकडून किल्ल्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक सुद्धा शाळेतील विद्यार्थी, पर्यटक नागरिक यांना या किल्ल्याविषयी माहिती देऊन आणखीन जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा : भाईंदर मधील १४९ शस्त्रे पोलिसांकडे जमा; ५ जण तडीपार

किल्ल्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी किल्ल्याला आता संरक्षक जाळ्या लावण्यात येत आहेत. रात्रीच्या सुमारास किल्ल्या प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

कैलास शिंदे, अधीक्षक पुरातत्त्व विभाग वसई
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai compound fencing on vasai fort by asi 450 meter css