वसई: वसईच्या किल्ला परिसरातील बिबट्याची दहशत अद्याप कायम आहे. हा बिबट्या मागील वीस दिवसांपासून मोकाट असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सध्याकाळच्या रोरो सेवेच्या दोन फेर्‍या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्याची ही पहिलीचे वेळ आहे. वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. वसई किल्ला परिसरात असलेल्या जेटीतून रोरो सेवा सुरू होते. मात्र या किल्ल्यात २९ मार्च रोजी बिबट्या आढळला होता. तेव्हापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजूनही या बिबट्याचा शोध लागला नाही. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, आवश्यक ठिकाणी पिंजरे लावले आहेत. परंतु बिबट्या बाहेर येण्याच्या वेळेत सातत्याने मानवी वर्दळ असते. याशिवाय रोरो सेवेकडे जाणारा मार्ग सुध्दा किल्ल्यातून जात आहे. त्यामुळे सायंकाळी सुद्धा वाहनांची मोठी वर्दळ असते. ही मानवी वर्दळ रोखण्यासाठी काही दिवस रोरो सेवेच्या फेऱ्या रद्द करण्यात याव्या असे पत्र वनविभागाच्या मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी श्वेता आडे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाला दिले होते.

हेही वाचा :टँकर अपघातात ५ वर्षीय नातवासह आजीचा मृत्यू

याशिवाय वसईच्या उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थ, वनविभाग, रोरो सेवा चालक यांच्यात पार पडलेल्या संयुक्त बैठकीत बिबट्या सापडत नाही तोपर्यंत सेवा बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. किमान सायंकाळी असलेल्या दोन फेऱ्या रद्द करण्यात याव्या अशी सूचना रोरो व्यवस्थापकांना करण्यात आली होती त्याच अनुषंगाने वसई ते भाईंदर या रोरो सेवेच्या शेवटच्या दोन फेऱ्या १३ एप्रिल पासून रद्द केल्या आहेत. ५.१५ आणि ६.४५ अशा फेऱ्या रद्द केल्या असून वसई वरून ३.४५ ची शेवटची फेरी असेल तर भाईंदर वरून ४.३० वाजता असणार असल्याची माहिती रोरो व्यवस्थापक यांच्या मार्फत देण्यात आली आहे. यामुळे संध्याकाळच्या वेळेस बिबट्याकडून कुणावरही हल्ला होणार नाही, असा विश्वास रोरोच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केला.

हेही वाचा : राज भगतने रचला इतिहास! वसईतून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणारा पहिला तरूण ठरला

वसईवरून शेवटची रोरो- संध्या ३ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल

भाईंदर वरून शेवटीत रोरो- ४: ३० वाजता असेल