वसई : पावसाळा सुरू होताच राना वनात तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या रान भाज्यांची आवक वाढली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी बांधव त्याची रस्त्याच्या कडेला बसून विक्री करून त्यातून रोजगार मिळू लागला आहे.

वसई तालुक्याचा पूर्वेच्या परिसर हा डोंगराळ परिसर आहे. निसर्गरम्य असलेल्या परिसरात पावसाळ्यात नैसर्गिक रानभाज्या उगवतात. यात कोरल, चवळीभाजी खापरा, अंबाडी, शेवाळे, मायाळू, आळूची पाने, शेवग्याच्या शेंगा, माठ भाजी कुळूची भाजी, कोरड, बांबू नाळे, कवळी, माठ, टाकळा, लोत, शेवली, तेरा, कडूकंद, फांग, चाईचा मोहर, बोखरीचा मोहर, टेहरा, वायरटे, रानकंद मोखा, वाघाटा, दिघवडी, भूईफोड, उळशाचा मोहर, कंटोली अशा विविध भाज्यांचा समावेश आहे.

रान भाज्या म्हणजे कुठल्याही प्रकारच्या खताची फवारणीची गरज नसते. नैसर्गिकरित्या या भाज्या उगवतात. त्यातील अनेक भाज्यांना औषधी गुणधर्म असल्याने खवयांकडून त्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे ग्रामीण भागात राहणारे आदिवासी बांधव रानभाज्या रानावनात फिरून गोळा करून त्या जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांच्या कडेला जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांना सहज दिसतील अश्या प्रकारे मांडून विक्रीसाठी बसून आपला रोजगार मिळवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या रानभाज्या विक्रीतून दिवसाला साधारणपणे पाचशे ते सहाशे रुपये इतका रोजगार मिळत आहे. हा रोजगार हंगामी स्वरूपाचा आहे असे रानभाज्या विक्रेत्या महिलांनी सांगितले आहे. पाऊस नियमित झाल्यास रानभाज्या उगविण्याचे प्रमाण वाढेल असेही रान भाज्या विक्रेत्यांनी सांगितले आहे.

जंगल पट्टा कमी होत असल्याचा परिणाम

मागील काही वर्षांपासून जंगल व डोंगर पट्ट्यात अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे जंगल पट्टा हा कमी होऊ लागला आहे त्यामुळे राना-वनात उगवणाऱ्या रानभाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. सुरवातीला अगदी जवळच्या रानात गेले तरीही रानभाज्या दिसून येत होत्या आता पुर्ण जंगल पट्टा फिरून रानभाज्या गोळा कराव्या लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.