वसई: लग्न नजुळत नसल्याने एका तरुणीने नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे. तिला बोलण्यात अडचण येत असल्याने तिचे लग्न जुळत नव्हते. श्वेनी धंधुकिया (३०) ही तरुणी आपल्या पालकांसह मिरा रोड येथील प्लेझंट पार्क येथे रहात होती. जन्मत: तिला बोलण्यात अडचण होती. त्यामुळे तिचे लग्न जुळत नव्हते. तिला लग्नासाठी बघण्यासाठी येणारी मुले तिच्या बोलण्यातील दोषामुळे तिला नकार देत होते. यामुळे श्वेनी वैफल्यग्रस्त झाली होती. यामुळे आपल्या राहत्या घरात तिने स्वयंपाकघरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा : भाईंदर: पालिकेच्या प्रकल्पातील खड्ड्यात मुलाचा मृत्यू, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

श्वेनीच्या वडिलांचा व्यवसाय आहे. ते आपल्या मुलीचे लग्न जुळविण्यासाठी प्रयत्न करत होते. येत्या नवरात्रीत दोन्ही मुलांचे लग्न करायचे होते. परंतु त्या आधीच आमच्यावर हे संकट कोसळलं असे तिच्या वडिलांनी सांगितले. श्वेनी दिसायला सुंदर होती. पंरतु या दोषामुळे पुढील शिक्षण देखील करता आले नाही, असे तिच्या वडिलांनी सांगितलं. आम्ही या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे असे या प्रकरणाचा तपास करणारे काशिमिरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तागडे यांनी सांगितले.