वसई: पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी वसई विरार मध्ये पालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे लेखापरीक्षण करवून घेतले जात आहे. आतापर्यंत ९० शाळांचे लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाले असून त्यात ११ शाळा अतिधोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. वसई विरार शहरात जिल्हा परिषदेने दोनशेहून अधिक शाळा उभारल्या होत्या. विशेषतः गोर गरीब व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने या शाळा अत्यंत महत्वाच्या आहेत.

सद्यस्थितीत केवळ १९२ शाळा उरल्या आहेत.  यातील पालिकेच्या कार्यक्षेत्रात ११६ शाळा येत आहेत. मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांकडे शासनाने लक्ष न दिल्याने अनेक भागातील शाळांची अवस्था फारच बिकट बनली आहे.  काही शाळा या अनेक वर्षे जुन्या असल्याने अशा शाळांच्या भिंतींना तडे जाणे, प्लास्टर निखळून पडणे,  फरशी तुटलेल्या फुटलेल्या , छतगळती अशा समस्या निर्माण होत आहेत.

पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेने कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून त्याचे अहवाल मागविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ११६ शाळांपैकी ९० शाळांचा संरचनात्मक लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाला आहे. यात सी १ या वर्गवारी मध्ये ११ शाळा अतिधोकादायक स्थितीत आहे.म्हणजेच वापरास अयोग्य अशी स्थिती आहे. तर सी २ ए मध्ये व सी २ बी मध्ये ७६ शाळा येत असून त्यांची संरचनात्मक दुरुस्ती करावी लागणार आहे तर सी ३ मध्ये ३ शाळांना किरकोळ दुरुस्तीची गरज आहे असे या अहवालातून समोर आले आहे. या शाळांच्या स्थितीबाबत त्यांची वेळेत दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे अशा सूचना पालिकेने संबंधित शिक्षण विभागाला केल्या असल्याचे पालिकेचे उपायुक्त ( शिक्षण) डॉ सुभाष जाधव यांनी सांगितले आहे. याशिवाय उर्वरित शाळांचा अहवाल मागविण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

पालिकेच्या कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांची स्थिती जाणून घेतली जात आहे. ज्या शाळा अतिधोकादायक व धोकादायक आहेत त्यानुसार त्या दुरुस्त करून घेण्याच्या सूचना करीत आहोत.

डॉ. सुभाष जाधव, उपायुक्त ( शिक्षण) वसई विरार महापालिका

अतिधोकादायक जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा धानिव, पेल्हार हायवे, विरार पूर्व चंदनसार, कसराळी, तळ्याचा पाडा, कामण उर्दू, मनवेलपाडा विरार, नाळे गाव, नेहरू हिंदी विद्यालय विरार पश्चिम, पाटीचा पाडा, सोपारा उर्दू शाळा यांचा अतिधोकादायक शाळांमध्ये समावेश आहे.

शाळा हस्तांतरणासाठी प्रयत्न

महापालिका स्थापन झाल्यापासून  वसई विरार शहरात पालिकेने एकही शाळा उभारली नाही.शहरात पालिकेकडून शाळा उभारणी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने नागरिक रीत असतात. परंतु जागेची अडचण, शिक्षण मंडळ अशा  अडचणीमुळे शाळांची उभारणी झाली नाही. कार्यक्षेत्रात येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा हस्तांतरण करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. नुकताच याबाबत वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सुद्धा शाळा हस्तांतरणा बाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता याशिवाय मंत्रालयात बैठक पार पडली होती. मात्र अजूनही हस्तांतरणाचा तिढा सुटलेला नाही.