Kantara Chapter 1 Movie Maharashtra Iconic Fort : नुकताच प्रदर्शित झालेला ‘कांतारा : चॅप्टर १’ हा त्याच्या आधीच्या कांतारा चित्रपटा इतकाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातील एक गाणं सध्या गाजत असून त्या गाण्याचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या एका प्रसिद्ध किल्ल्यात झाले आहे. यामुळे हा किल्ला सध्या चर्चेत आला आहे.
कांतारा हा चित्रपट प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याचा आहे. चित्रपटाची आगळीवेगळी कथा आणि तितक्याच ताकदीने करण्यात आलेल्या चित्रीकरणामुळे या चित्रपटाचे जोरदार स्वागत झाले आहे. त्यातले क्षेत्रपाल, पंजुर्ली, गुलिगा, वराह अवतार या सगळ्याभोवती गुंफलेले कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवते. ‘कांतारा : चॅप्टर १ या चित्रपटातील ‘रेबेल’ या गाण्याचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या एका प्रसिद्ध किल्ल्यात झाले आहे.
या गाण्यात आपल्याला वर्तुळाकार आणि नक्षीदार कमानी आणि खांब दिसतात. दाट झाडी आणि सेटमुळे हे चित्रीकरण एखाद्या किल्ल्यातील आहे हे सहज लक्षात येत नाही. हे चित्रीकरण ज्या किल्यात करण्यात आले आहे तो किल्ला म्हणजे मुंबईला अगदी खेटून असलेला प्रसिद्ध ‘वसई किल्ला’. या गाण्यातील काही भागाचे चित्रीकरण वसईच्या किल्यात करण्यात आले आहे. किल्ल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू रचनेचे दर्शन या निमित्ताने प्रेक्षकांना झाले आहे. याआधी देखील अनेक बॉलीवुड चित्रपटांच्या गाण्यांचे चित्रीकरण या किल्ल्यात झाले आहे.
वसई विरार शहर ‘मिनी गोवा’ म्हणून ओळखले जाते. या शहरात असणारा प्रसिद्ध वसई किल्ला हा इतिहासात गाजेलला आहे. अनेक ऐतिहासिक घडामोडी आणि तह या किल्यात झाले आहेत. वसईत पोर्तुगीजांची सत्ता असताना या किल्याचे बांधकाम करण्यात आले होते. पोर्तुगीज काळात हा किल्ला वैभवाच्या सर्वोच्च शिखरावर होता. पंधराव्या आणि सोळाव्या शतकात हा किल्ला पोर्तुगीजांच्या श्रीमंत वसाहतींपैकी एक मानला जात असे. १७३९ साली मराठ्यांनी नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकला होता. अरबी समुद्राच्या आणि वसई खाडीच्या टोकावर वसलेला हा किल्ला इतिहासात एक महत्वपूर्ण किल्ला म्हणून मानला जातो. चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या या किल्ल्याची पडझड झाली असून डागडुजी आणि नूतनीकरण करून किल्ला सुरक्षित ठेवण्यात यावा अशी इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांची मागणी आहे.
कोल्डप्लेसह अनेक बॉलीवुड चित्रपटातही वसईचा किल्ला
प्रसिद्ध ‘कोल्डप्ले’ च्या ‘Hymn for the Weekend’ या गाण्याचे काही चित्रीकरण वसई किल्ल्यात करण्यात आले होते. तसेच शाहरुख खानच्या ‘जोश’ या चित्रपटाचे काही चित्रीकरणही इथेच झाले होते. काहीवर्षांपूर्वी आलेला ‘ती सध्या काय करते’ या मराठी चित्रपटातील ‘जरा जरा’ या गाण्यातही वसईच्या किल्य्यातील ऐतिहासिक वास्तू दाखविण्यात आल्या होत्या. तसेच अनेक चित्रपट, गाणी आणि जाहिरातींमधून अनेकदा हा किल्ला झळकत असतो.