वसई: वसई विरार शहरात विविध ठिकाणी जुने आणि ऐतिहासिक तलाव आहेत. मात्र, तलावांमध्ये किंवा तलावांशेजारी केले जाणारे बांधकाम, तलावांच्या स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष आणि तलावाच्या पाण्यावर तयार होणाऱ्या जलपर्णीमुळे शहरातील तलावांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
वसई-विरार शहरात नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले शंभराहून अधिक तलाव आहेत.या तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी पालिकेने तलावांचे पुनरुज्जीवन करून त्यांना टप्प्याटप्प्याने विकसित करण्याचा निर्णय घेतलेला. तर अनेक तलाव सुशोभीत करून विकसित करण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही काळात या तलावाच्या आसपास झालेले अतिक्रमण, तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी, रस्त्यालगतच्या तलावात नागरिकांकाडून टाकण्यात येणारा कचरा, नागरिकांकडून तलावात विसर्जित केले जाणारे निर्माल्य आणि स्वच्छतेअभावी तलावात वाढणारी जलपर्णी यामुळे हे तलावांची दुरावस्था झाली आहे.
वसई विरार शहरात कामण, चुळणे, माणिकपूर, गोखीवरे, आचोळे, पापडी, तामतलाव अशा विविध ठिकाणी मोठे तलाव आहेत. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून या तलावातील गाळ आणि जलपर्णी काढून ते स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, अचानक कोसळलेल्या पावसामुळे गाळ काढण्याच्या कामाला काही काळ स्थगिती देण्यात आली. पण, त्यानंतर तलावांची पुन्हा नीट साफसफाई न झाल्यामुळे तलाव पुन्हा दूषित झाले आहेत. तर बहुतांश तलाव पुन्हा वाढलेल्या जलपर्णीच्या विळख्यात सापडले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
शहरातील तलावांची पाहणी करून त्याठिकाणी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सुशोभीकरणामुळे संवर्धनाकडे दुर्लक्ष?
वसई विरार शहरात महापालिकेकडून शहरातील तलावांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉक्रिटीकरण तसेच भराव टाकून तलावात बांधकाम केले जात आहे. पण, सुशोभीकरण करत असताना तलावातील निर्माल्य, शेवाळे, जलपर्णी तसेच तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी, गटाराचे पाणी यामुळे प्रदूषित होणाऱ्या तलावांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा, तसेच या सुशोभीकरणामुळे तलावांची भूजल पातळी खालावत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
