भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात मोकाट जनावरे आढळून आल्यास आता तबेलेधारकांना ३ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे शहरातील मोकाट जनावरांची समस्या मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिरा-भाईंदर शहरात साधारणपणे पाचशेहून अधिक जनावरे असून ती काही खासगी तबेलेधारकांची आहेत. मात्र, हे तबेलेधारक आपल्या जनावरांची योग्य काळजी घेत नसल्याने ही जनावरे शहरात मुक्तपणे संचार करताना दिसतात. बर्‍याच वेळा ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसल्यामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच रस्त्यावर शेण पसरल्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघात घडतात. याशिवाय ही जनावरे कोणत्याही क्षणी अंगावर येतील, अशी भीती प्रामुख्याने लहान मुले व महिलांमध्ये असल्याचे आढळून आले आहे.

म्हणूनच मोकाट फिरणाऱ्या जनावरांवर निर्बंध आणण्याचे महापालिकेचे धोरण आहे. अशा जनावरांना ताब्यात घेण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून आरोग्य निरीक्षकांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तरीदेखील शहरातील अनेक भागांत मोकाट जनावरांची समस्या कायम असल्यामुळे यावर अंकुश आणण्यासाठी प्रशासनाने आता अधिक कडक पाऊल उचलले आहे.यापूर्वी मोकाट जनावरांवर कारवाई करताना २ हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. आता त्यात आणखी एक हजार रुपयांची वाढ करून तब्बल ३ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. यामुळे तबेलेधारकांवर धाक बसेल आणि मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा पशुसंवर्धन अधिकारी विक्रम निराटले यांनी केला आहे.

…तर जनावरे गौशाळेला

मिरा-भाईंदर शहरात मोकाट जनावरे आढळून आल्यास ती ताब्यात घेतली जाणार आहेत. हे जनावर परत घ्यायचे असल्यास तबेलेधारकांना नियमानुसार तीन हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. मात्र, पाच दिवसांच्या आत कोणीही हे जनावर घ्यायला आले नाही तर ती जनावरे थेट गौशाळेत पाठवली जाणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.