भाईंदर: मिरारोड येथे नाल्याच्या अर्धवट कामामुळे नालेसफाईच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे येथील नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नाही. परिणामी, पावसाळ्यात या नाल्यांमध्ये गाळ साचून पाणी तुंबण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मिरा-भाईंदर शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय, रस्त्यालगत असलेल्या नाल्यांवर काँक्रिटचे बांधकाम करून पदपथ उभारले जात आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असून, अनेक ठिकाणी ही कामे सुरू आहेत. मात्र पावसाळा तोंडावर असताना, यातील बरीचशी कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम नालेसफाईच्या कामावरही होऊ लागला आहे.

मिरारोड येथील प्लेझंट पार्क परिसरात नाल्याच्या अर्धवट कामामुळे नालेसफाईचे काम न झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचलेला आहे. त्यामुळे पाणी तुंबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील अंतर्गत नाल्यांची स्वच्छता करून घेण्याचे सक्त आदेश महापालिका प्रशासनाने कंत्राटदारांना दिले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असल्यामुळे तेथील नाल्यांची स्वच्छता करणे शक्य होत नसल्याचे सफाई कामगारांकडून सांगण्यात येत आहे. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी निचरा होण्यास अडथळे निर्माण होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी नाल्यांची स्वच्छता झाली नाही, असे निदर्शनास आल्यास महापालिकेला कळवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी केले आहे.

मोकळ्या नाल्यांमुळे अपघाताचा धोका

मिरा-भाईंदर शहरात नाल्यांचे अर्धवट काम करून संबंधित परिसर तसाच मोकळा सोडण्यात आला आहे. यामुळे मुसळधार पावसात पाणी साचल्यास नागरिकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होईल, आणि त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यापूर्वीही नाल्यात पडून जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे शहरातील नाले झाकून घेण्यात यावेत किंवा त्यांच्या भोवती सुरक्षितता आवरण उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सज्जी आयपी यांनी केली आहे.