वसई: गणेशोत्सव संपताच वसई विरार शहरात आता नवरात्रोत्सवाची लगबग सुरु झाली आहे . यासाठी शहरातील विवीध ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून तसेच गृहसंकुलांमध्ये मंडप उभारणी आणि सजावटीची कामं सुरु झाली आहेत. तर देवीच्या मूर्ती घडवण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

वसई विरार शहरात विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दहिहंडी, गणेशोत्सव हे सण हर्षोल्हासात साजरे केल्यानंतर सार्वजनिक मंडळांना तसेच भाविकांना आता ओढ लागली आहे ती नवरात्रौत्सवाची. यंदा २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. वसई विरार शहरात घरोघरी घटस्थापना करून तर सार्वजनिकरित्या नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

नवरात्रोत्सवासाठी अवघा एक आठवडा बाकी असताना सार्वजनिक मंडळांकडून चौकात, रस्त्याच्याकडेला, मोकळ्या मैदानात मंडप उभारले जात आहेत. तर काही ठिकाणी गणेशोत्सवासाठी उभारलेल्या मंडपातच देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याआधी जुनी सजावट काढून नवरात्रौत्सवाला साजेशी सजावट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

शहरातील बाजारही रंगीबेरंगी चनिया चोली, बांधणीच्या ओढण्या, केडिया, वेगवेगळ्या रंगाचे आणि नक्षीदार दांडिया, ऑक्सिडाइज्ड दागिने, घटस्थापनेसाठी मणी, हिऱ्यांनी सजवलेली, रंगकाम केलेली मडकी, बांबूच्या परड्या, सजावटीसाठी लागणारे साहित्य अशा विविध सामानाने आता सजू लागला आहे.

तर मूर्तीशाळेतही मूर्तिकारांनी लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश मूर्तिशाळांमधील घरगुती, लहान देवीच्या मूर्ती तयार झाल्या असून आता मोठ्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. देवीच्या मोठ्या मूर्तींवर कारागिरांकडून शेवटचा हात फिरवला जात असून देवीच्या मूर्तीला कृत्रिम पापण्या लावणे, हिऱ्यांची सजावट करणे, दागिने घालून मूर्ती सजवणे ही कामे केली जात आहेत.

मंडपाच्या कामामुळे वाहतूकीस अडथळा

नवरात्रोत्सवाला जवळपास आठवडा शिल्लक असताना सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या उत्साहात मंडप उभारणीची, सजावटीची कामं केली जात आहेत. यासाठी रस्त्याच्याशेजारील तसेच चौकातील जागा अडवण्यात आली आहे. त्यामुळे मंडप उभारणीसाठी वापरले जाणारे बांबू, कापड, ताडपत्री, शिडी, तसेच इतर अवजारं मंडपाशेजारी रस्त्याच्याकडेला ठेवली जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी मंडपांमुळे रुंद असणारा रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्नही निर्माण झाला आहे.