रुग्णालयांना रुग्णांच्या हक्कांची सनद, दरपत्रक दर्शनी भागात लावणे आवश्यक असताना या नियमांकडे पाठ फिरविण्यात आली आहे. असे फलक लावण्याऐवजी रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण आणि धमकी केल्यास काय शिक्षा होईल त्याबाबत इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना चांगली सेवा मिळावी, रुग्णांची आर्थिक लुट आणि फसवणूक होऊ नये तसेच रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये समन्वय रहावा यासाठी २०२१ मध्ये सुधारीत महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम (महाराष्ट्र नर्सिंग ॲक्ट) लागू करण्यात आला आहे. रुग्णालयांना या महाराष्ट्र शुश्रुषागृहाच्या अंतर्गत नोंदणी करावी लागते. पालिकेकडून तसे प्रमाणपत्र रुग्णालयांना सादर केले जाते. या महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अनेक नियम आहेत. ज्या मध्ये रुग्णालयातील रुग्णांचे हक्कांची सनद काय आहे ते तसेच दरपत्रक दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. रुग्ण ज्या रुग्णायालयात उपचार घेतो त्याला कुठले उपचार दिले जातात आणि त्याचे दर काय याची माहिती मिळते. त्यामुळे रुग्णाची फसगत टळते तसेच रुग्णालयाला खोटे आणि अवाजवी देयक आकारता येत नाही. या नियमानुसार मयतांचा नातेवाईकाना देयक भरले नाही म्हणून मृतदेह रोखून ठेवता येत नाही. याशिवाय शुल्क अदा केले नसल्यास रुग्णाला रुग्णालयात थांबवूनही ठेवता येत नाही. रुग्णांना रक्त पुरविण्याची जबाबदारी देखील संबंधित रुग्णालयांची असते.

हेही वाचा >>> वसई : बेपत्ता शाळकरी मुलीचा मृतदेह आढळला

वसई विरार मधील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये असे फलक अद्यापही नाहीत. तरी पालिकेने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. आता तर रुग्णालयांनी नागरिकांची सनद लावण्याऐवजी सरकारी कामात अडथळे आणल्यास काय कारवाई होईल त्याची माहिती देणारे फलक लावले आहेत. रुग्णालयात येणार्‍या रुग्णांच्या हिताचे फलक तर दूरच उलट सरकारी नोकराला धमकी दिल्यास, हल्ले केल्यास काय कारवाई केली जाते ती कलमे दर्शविणारे फलक लावून एकप्रकारे रुग्णांनाचा घाबरविण्याचा प्रकार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेश निकम यांनी सांगितले. असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

रुग्णालयांनी रुग्णांच्या हक्काची सनद लावणे बंधनकारक असून ज्या रुग्णालयांनी लावले नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय बेकायदेशीर फलक असतील तर ते काढून टाकण्यात येतील अशी माहिती वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त विनोद डवले यांनी दिली.

सनद न लावल्यास ५ हजारांचा दंड

वसई विरार मधील बहुतांश रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियमांच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियमांचे उल्लंघन करणार्‍या रुग्णालयांना ५ हजारांचा दंड आकारण्याची तसेच दंड न भरल्यास प्रतिदीन ५० रुपये दंडाच्या रकमेची तरतूद आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice board warning patient about the punishment for assaulting and threatening doctors in hospitals zws