वसई:- विरार-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प उभारणीच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे किनाऱ्यालगतचे कोळीवाडे व मच्छीमारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधाची धार अधिक तीव्र झाली आहे. नुकताच विरार अर्नाळा येथे बैठकीतही या प्रकल्पाबाबत विरोध दर्शवला तर शुक्रवारी उत्तन येथील समुद्र किनाऱ्यावर सर्वेक्षणही बंद पाडत विरोध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्सोवा ते विरार असा सुमारे ४२.७५ किलोमीटरचा सागरी सेतू तयार करण्याचा प्रकल्प शासनाने नियोजित केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. या प्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक स्तरावरून हळूहळू हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.नुकताच याबाबत एमएमआरडीएचे अधिकारी व मच्छिमार संघटना यांची विरार अर्नाळा येथे बैठक पार पडली. मात्र या प्रकल्पामुळे सागरी किनाऱ्यालगत असलेले कोळीवाडे व व तेथील मच्छीमारांचा पारंपारिक व्यवसाय अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला विरोधच आहे, असे येथील मच्छीमारांनी सांगितले आहे.

हेही वाचा – खासगी बसेसची परराज्यात बेकायदेशीरपणे नोंदणी आणि राज्यात वापर, मोठी टोळी कार्यरत

वसई विरारच्या अर्नाळा भागातून सुमारे तीनशे मच्छीमारांच्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच तेथील बांधवांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आधीच समुद्रात निर्माण होणाऱ्या विविध अडचणी यामुळे मच्छीमार अडचणीत आहेत. त्यातच आता वर्सोवा व विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे त्याचे बंदरही आमच्या भागात होणार आहे याशिवाय समुद्रात बांधकामही केले जाणार आहे त्यामुळे आमच्या बोटी ये-जा करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होणार आहे. याशिवाय मत्स्य उत्पादनही कमी होईल आणि याचा परिणाम आमच्या मच्छीमार बांधवांवर होणार आहे, त्यामुळे आम्ही तीव्र विरोध केला असल्याचे अर्नाळा येथील महाराष्ट्र कृती समितीचे चिटणीस मोरेश्वर वैती यांनी सांगितले. एमएमआरडीएचे अधिकारी आम्हाला प्रकल्पाचे सादरीकरण दाखवीत होते. आम्हाला प्रकल्पच नको आहे त्यामुळे आम्ही ते सादरीकरण बघणार नाही, अशी भूमिका घेत मच्छीमार बांधवांनी कडाडून विरोध नोंदविला.

१) कोळीवाडे नष्ट होण्याची भीती

वर्सोवा-विरार सागरी सेतू उभारण्यासाठी एमएमआरडीएकडून प्रत्यक्ष सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पाबाबत मच्छीमारांना माहिती दिली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. शुक्रवारी भाईंदर पश्चिम येथील उत्तन किनार पट्ट्यात सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला मच्छीमार बांधवानी समुद्रात जाऊन विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे आमचे कोळीवाडे नष्ट होणार असल्याची प्रतिक्रिया विरोधासाठी समुद्रात गेलेले माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद यांनी दिली आहे.

हेही वाचा – आता मत्स्य दुष्काळाचे सावट, उत्पादन २५ टक्क्यांवर, कर्जदार मच्छीमारांना चिंता

२) जैवविविधता धोक्यात

यंदाच्या वर्षी समुद्रात मच्छीमारांना मिळणाऱ्या मासळीची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे, त्यातच आता वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प उभारला जात आहे, यासाठी खोल समुद्रात सर्वेक्षण सुरू केले आहे. हा प्रकल्प झाल्यास कोळी बांधवांचा मासेमारी पारंपरिक व्यवसाय संपुष्टात येणार आहे. याशिवाय समुद्रात असलेली जैवविविधताही धोक्यात येणार असल्याची प्रतिक्रिया मच्छीमारांनी दिली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition to virar versova sea bridge project arnala uttan fishermen associations stopped the survey work ssb