वसई: मागील काही दिवसांपासून वसई विरार शहरात कोसळणाऱ्या पावसाने नालेसफाईच्या कामात खोडा घातला आहे. विविध ठिकाणच्या भागात नालेसफाईच्या कामाला गती मिळत नसल्याने ३१ मे च्या मुदतीत नालेसफाईची कामे पूर्ण होतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वसई विरार महापालिकेने पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचे काम हाती घेतले होते. शहरात १७१ किलोमीटर लांबीचे २०५ नाले आहेत. त्यांच्या सफाईचे काम ४ एप्रिल पासून सुरू करण्यात आली होती₹करण्यात येत असलेली नालेसफाई ही यांत्रिक पद्धतीने केली जात असून यासाठी २१ लॉंग बुम पोकलेन, ३१ शॉर्ट बुम पोकलेन, २० जेसीबी व गाळ वाहतुकीसाठी २५ डंपर कार्यरत करण्यात आले होते.

मात्र काम सुरू असताना मागील काही दिवसांपासून वसई विरार भागात पावसाची हजेरी लागत आहे. पडलेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल तयार झाला असून नालेसफाईच्या कामात ही अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. दरवर्षी शहरात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सूनला सुरवात होत असते. त्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असतो. मात्र पावसामुळे यंदाच्या वर्षी हव्या त्या प्रमाणात नालेसफाईचे काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

पावसामुळे चिखल झाल्याने पोकलेन वगळता अन्य नालेसफाईसाठी लागणारी यंत्रणा आतील भागात जात नाही. त्यामुळे या वर्षीची नालेसफाई दिलेल्या विहित वेळेत पूर्ण होईल की नाही यावर आता नागरिक प्रश्न विचारू लागले आहेत. तर दुसरीकडे नालेसफाईच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गाळ ही बाहेर निघाला होता. तो गाळ काही भागात उचलला न गेल्याने पावसाने त्याचा ही अक्षरशः चिखल करून ठेवला आहे. तो गाळ पुन्हा नाल्यात जाऊन नाले तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नालेसफाईचे काम सुरूच आहेत. नियमित पणे त्या कामाचा आढावा घेतला जात असून उर्वरित जी कामे प्रलंबित आहेत ती सुद्धा लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – नानासाहेब कामठे, उपायुक्त ( घनकचरा व्यवस्थापन विभाग) महापालिका

८५ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा

वसई विरार महापालिकेने ८५ टक्के इतकी नालेसफाईची कामे पूर्ण झाले असल्याचा दावा केला आहे. यात मुख्य नाले यासह इतर छोटे नालेही स्वच्छता पूर्ण झाले असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पाऊस असल्याने जरी अडचणी असल्या तरीही जेवढं शक्य आहे तेवढं काम ठेकेदाराकडून करवून घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उर्वरित कामे ही लवकरच मार्गी लागतील असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

कांदळवनांचे अडथळे कायम

शहरात पाणी निचरा होण्यासाठी नैसर्गिक खाड्या व नाले आहेत. याच नाल्यातून पावसाचे पाणी व शहरातील सांडपाणी याचा निचरा होत असतो.मात्र सद्यस्थितीत या नैसर्गिक खाड्यांमध्ये असलेल्या कांदळवनांची प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे पाणी जाण्याचा मुख्य मार्गच अरुंद होऊ लागले आहेत.त्यामुळे शहरातील नालेसफाई करताना सुद्धा पालिकेला अडचणी येत आहेत.अनेकदा कांदळवनात पावसाच्या पाण्यासत विविध ठिकाणांहून वाहून येणारा कचरा अडकून राहतो त्यामुळे पुढे पाण्याचा निचरा सुरळीत होत नाही. याचाच फटका पावसाळ्यात बसून पूरस्थिती सारख्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पूरस्थितीची भीती

वसई विरारच्या नालेसफाईला यंदाच्या वर्षी मे महिन्यात कोसळत असलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाचा फटका बसला आहे. शहरातील अनेक भागातील नाल्याची स्वच्छता झाले नाही याशिवाय अंतर्गत गटारे ही स्वच्छ झाली नाहीत त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा पूरस्थितीची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.