वसई: वसई तालुक्यात वाळू माफियांमार्फत विविध ठिकाणी अवैध वाळू उपसा केला जातो. या विरोधात गेल्या दहा महिन्यात वसईच्या महसूल विभागाकडून सात ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १३ बोटी, १८ सक्शन पंप, दहा रेतीच्या कुंड्या उध्वस्त करण्यात आल्या आहेत.

वसई विरार शहराला लागून असलेल्या विस्तीर्ण खाडी प्रदेशातील खाडीपात्रांमध्ये तसेच नदीपात्रांमध्ये वाळूचा मोठ्या प्रमाणावर साठा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाळू उपसा करण्याची परवानगी देण्यात येते. मात्र त्या व्यतिरिक्तही इतर वाळू माफियांमार्फत शहरातील विविध ठिकाणच्या खाडीपात्रात तसेच नदीपात्रातून बेकायदेशीरपणे सक्शन पंपाच्या साहाय्याने वाळू उपसा केला जातो.

शहरातील वाढत्या अवैध वाळू उपशामुळे किनारपट्टी भागांवर याचा दुष्परिणाम होऊ लागला आहे. अशा वाळू उपसा रोखण्यासाठी शासन स्तरांवर विविध सामाजिक संघटना यांनी अनेकदा तक्रारी सुद्धा केल्या आहेत.

वाढत्या तक्रारीनंतर  महसूल विभागाकडून अशा वाळूमाफियांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्देशानुसार जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात शिरगाव, वैतरणा पूल, उंबरपाडा, खानीवडे, कोपरी, कसराडे, तानसा नदी या सात ठिकाणी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान १३ बोटी, १८ सक्शन पंप, दहा रेतीच्या कुंड्या, एक डिझेल पंप उध्वस्त करण्यात आला असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.

तीन जणांवर गुन्हा दाखल

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध वाळू उपसाप्रकरणी एकूण सात ठिकाणी गेल्या दहा महिन्यात कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान मांडवी पोलीस ठाण्यात तिघाजणांना विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनारपट्टीचा परिसर धोक्यात

मागील काही वर्षांपासून खाडी व नदीच्या पात्रात तसेच समुद्र किनारपट्टीच्या भागात छुप्या मार्गाने बेसुमार वाळू उपसा होऊ लागला आहे. त्यामुळे किनारा हळूहळू खचू लागला आहे. काही ठिकाणी किनारापट्टीवरील घरांचा पाया खचला आहे. याशिवाय विविध प्रकारची वृक्ष ही यात नष्ट झाली आहेत. तर दुसरीकडे मासळी सुकविण्यासाठी जागा ही नष्ट झाली आहे. वाळू उपसा असाच सुरू राहिला तर याचा मोठा फटका आजूबाजूच्या परिसराला बसेल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अवैध वाळू उपसाप्रकरणी आमची कारवाई सुरूच आहे. वाळू माफीयांना आळा घालण्यासाठी ज्या ठिकाणी यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. त्या ठिकाणांना दर आठवड्याला भेट देऊन त्यांची पाहणी अधिकारी करत आहेत. –राजाराम देवकाते, निवासी नायब तहसीलदार वसई