ऑटोरिक्षाचे परवाने खुले झाल्यानंतर नवीन रिक्षा खरेदीकडे कल वाढू लागला आहे. वसई विरार शहरात ही रिक्षांची संख्या बेसुमार वाढू लागली आहे. मागील तीन वर्षात परिवहन विभागाने सुमारे १० हजार २४७ इतके नवीन रिक्षा परवाने मंजुर केले आहेत. वसई विरार शहर हे झपाट्याने विकसित होत आहे. त्यासोबत लोकसंख्या व वाहनांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. 

सुरवातीला राज्य परिवहन विभागाने रिक्षांचे परवाने बंद केले होते. त्यामुळे काही मोजक्याच परवाना धारक असलेल्या रिक्षा रस्त्यावर धावत होत्या. परंतु परवाना मिळत नसल्यामुळे काही रिक्षाचालकांना नाईलाजाने अनधिकृतपणे रिक्षा चालवावी लागत होती.  परंतु परवाने खुले होताच रिक्षा परवाने काढून नवीन रिक्षा खरेदी करण्याचे प्रमाण सर्वाधित झाले आहे.त्यासाठी लागणारे परवाने काढून घेण्यासाठी नागरिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात येत असतात. २०२३ ते २०२५ या तीन वर्षात १० हजार २४७ इतके परवाने वितरित करण्यात आले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

त्यामुळेशहरात दिवसेंदिवस रिक्षांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वसई, नालासोपारा, नायगाव, महामार्ग, विरार अशा सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्षा धावताना दिसून येत आहेत.

शहरात रिक्षांची संख्या वाढत असली तरी शहरातील रस्तेही अपुरे पडू लागले आहेत. याचा परिणाम हा वाहतुकीवर होऊ लागला आहे. त्यातच काही बेशिस्त रिक्षा चालक हे  उलट सुलट रिक्षा उभी करीत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. विशेषतः स्थानक परिसरात अशा प्रकारे रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना ही या रिक्षांचा गराड्यातून वाट काढत बाहेर पडावे लागत असल्याचे चित्र वाढत आहे.

प्रवाशांनी जायचे कुठून ?

वसई विरार शहरात रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे विशेषत रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या संख्येने रिक्षा उभ्या असतात. त्यातील काही रिक्षा या अस्ताव्यस्त पद्धतीने उभ्या केल्या जातात.  त्यामुळे कामावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनाही त्या रिक्षांच्या गराड्यातून वाट काढताना कसरत करावी लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आशिष कदम यांनी सांगितले आहे. याशिवाय काही रिक्षा चालक विनाकारण हॉर्न वाजवत असतात त्याचाही त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

सीएनजी सुविधा अपुरी

वाढत्या इंधन दरवाढीमुळे अनेक जण आता सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षा खरेदी करत आहेत मात्र त्यासाठी लागणाऱ्या  सीएनजी गॅस सुविधा अपुऱ्या आहेत. वसई विरार मध्ये केवळ चार ते पाच ठिकाणी सुविधा आहे. तेथेही मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे अनेकजण महामार्गावरून फाऊंटन किंवा मग घोडबंदर अशा ठिकाणी जातात.

अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट सुरूच

एकीकडे अधिकृत पणे रिक्षांचे परवाने वितरित केले जात असले तरी दुसरीकडे अनधिकृत पणे रिक्षा चालविण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. विशेषतः असे रिक्षाचालक कोणत्याही प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागू नये यासाठी हे रिक्षाचालक रात्रीच रिक्षा घेऊन बाहेर पडत आहेत. यातील बहुतांश रिक्षाचालक हे गर्दुल्ले असून मारामारी, अरेरावी या सारखे प्रकार ही घडतात. तर काही रिक्षाचालक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. अनेकदा काही रिक्षा चालक हे अरेरावीची भाषा करीत असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत.

शहरात नियमबाह्य रिक्षा चालविणे, अनधिकृत रिक्षा याबाबत वायू वेग पथकांकडून कारवाया सुरूच आहेत. येत्या काळात ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल. :अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई.