वसई: वसईतील बंगली रस्त्याच्याकडेला महापालिकेकडून गटार बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे उउघडी गटारं नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागली आहेत. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक तसेच मोकाट जनावरे या गटारांमध्ये पडल्याच्या घटना घडल्यामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.

वसई पश्चिमेतून बंगली रस्ता गेला आहे. सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा या उद्देशाने या रस्त्यावर असणाऱ्या कार्डिनल रुग्णालयाच्या शेजारी महापालिकेकडून गटार बांधणीचे काम सुरु करण्यात आले होते. पण वर्ष उलटून गेल्यानंतरही गटाराचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे आता हेच उघडे गटार नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. दोन महिन्यांपूर्वी एक महिला गटारात पडल्याची तर काही दिवसांपूर्वी एक गाय गटारात पडल्याची घटना घडली होती.

या अपघातानंतर तात्पुरत्या स्वरूपात गटारावर झाकणे बसवण्यात आली. पण नागरिकांच्या मते, ही झाकणे देखील उलटी लावण्यात आली असून झाकणांना लावलेले खिळे बाहेर आले आहेत. तर दुसरीकडे गटारासाठी पाईप टाकलेला भाग उघडा असून, या ठिकाणी लहान-मोठे दगड जमा झाले आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या लहान मुलांना, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकीकडे गटाराचे काम अपूर्ण असताना, याच मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाहनांची वर्दळ अधिक असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे विकासकामांच्याबाबतीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या हलगर्जीपणाबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दुर्घटना होण्यापूर्वीच वर्षभरापासून रखडलेले गटार बांधणीचे काम पूर्ण करण्याचे तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन हे काम पूर्ण करण्यास सांगितले जाईल. याशिवाय काम करताना योग्य ते काळजी घेण्याच्या सूचना ही केल्या जातील असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.