भाईंदर:-यंदाचा पावसाळा मच्छीमारांसाठी अपेक्षेपेक्षा वेगळा ठरला आहे. मासळीप्रेमींसाठी खास मान्सूनमध्ये खवय्यांचे आकर्षण असणारी सुके बोंबील यंदा बाजारातून गायब झाले आहेत. त्यामुळे मच्छीमारांपासून ग्राहकांपर्यंत सर्वच स्तरांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.

भाईंदर पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यावर वर्षानुवर्षे मासेमारी करणारे मच्छीमार सध्या सुक्या मासळीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आले आहेत.याचे मुख्य कारण म्हणजे यंदाच्या हंगामात बोंबीलच्या ओल्या विक्रीला प्रचंड मागणी मिळाली. एरवी सुमारे २ हजार रुपये प्रति टप दराने विकली जाणारे बोंबील, यंदा ५ हजार रुपयांवर पोहोचली. परिणामी, मच्छीमारांनी ओल्या बोंबीलची विक्रीच अधिक केली आणि ती सुकवण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यात हवामानातील अनिश्चितेचा देखील मोठा फटका मच्छिमारांना बसला आहे.

यंदा मे महिन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे परातीवर सुकविण्यास ठेवलेले बोंबील भिजून खराब झाले. त्यामुळे आधीच साठवलेला थोडाफार सुकवलेला बोंबील सुद्धा बाजारात येण्याआधीच नष्ट झाला.परिणामी आता ना बाजारात सुके बोंबील उपलब्ध आहेत, ना मच्छीमारांकडे साठा आहे. “दरवर्षी मान्सूनमध्ये आम्ही घरासाठी थोडी बोंबील बाजूला काढतो. पण यंदा ती संधीच मिळाली नाही. ग्राहक विचारत आहेत, पण आमच्याकडेच नाही,” असा सूर स्थानिक मच्छीमार व्यक्त करत आहेत. तर ग्राहकांना यंदा सुकी मासळी मिळाली नसल्याने त्यांचा ही हिरमोड झाला आहे.

सुक्या मासळी अभावी मच्छिमार आर्थिक संकटात:-

भाईंदर पश्चिम येथील समुद्रकिनाऱ्यावर अनेक वर्षांपासून मासेमारी करणारे मच्छीमार हंगामात मिळणाऱ्या मासळीचा मोठा भाग सुकवून साठवतात. हीच मासळी पावसाळ्यात विकून अनेकांना मासिक १० ते १२ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. विशेषतः जे लहान कुटुंब आहेत किंवा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बोटी, साधने नाहीत, त्यांच्यासाठी ही सुकी मासळीच जगण्याचा आधार ठरते. मात्र यंदा अवकाळी पाऊसामुळे मासळीचे नुकसान झाल्यामुळे अनेक मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत.