भाईंदर :- बहुचर्चित मिरा-भाईंदर मेट्रो मार्गिका ९ च्या चाचपणीला अखेर सुरुवात झाली आहे. रविवारी प्रत्यक्षात मेट्रोचे इंजिन या मार्गावरून चालवून चाचपणी केली.त्यामुळे वर्षा अखेरीस नागरिकांना दहिसर ते काशिगावदरम्यान प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.मागील पाच वर्षांपासून मिरा-भाईंदर शहरात ‘दहिसर-भाईंदर मेट्रो मार्गिका ९’ ची उभारणी प्रगतीपथावर सुरू आहे. सध्या या प्रकल्पाचे स्थापत्य काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून, मेट्रो स्थानक आणि मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचे दोन टप्प्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे – टप्पा एक: दहिसर ते काशिगाव आणि टप्पा दोन: काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान. या आधारे येत्या वर्षभरात संपूर्ण मेट्रो मार्ग सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.
त्यानुसार, १० मे रोजी पहिल्या टप्यासाठी आवश्यक असलेला २५ हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह जोडण्यात आला आहे. यामुळे काशिगाव ते दहिसरदरम्यान असलेल्या चार स्थानकांवरील कामाची गती वाढवण्यास मदत होणार आहे. तर ११ मेपासून प्रत्यक्ष मेट्रोचे इंजिन या मार्गावरून चालवून चाचपणीस देखील सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या वर्षाअखेरीस पहिल्या टप्प्याचा लाभ घेता येणार असल्याचा दावा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.