लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: वसई पूर्वेच्या भागात तुंगारेश्वर अभयारण्यातील संरक्षित वनक्षेत्र व इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये मागील काही वर्षापासून अतिक्रमण, बेकायदेशीरपणे उभे राहत असलेले प्रदूषणकारी कारखाने याचा मोठा परिणाम या वनक्षेत्रावर होऊ लागला आहे.  या वाढत्या अतिक्रमणामुळे संरक्षित वन धोक्यात आले आहे.

वसई पूर्वेच्या भागात तुंगारेश्वर अभयारण्य परिसर आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्य, विविध प्रकारचे पशु पक्षी, विविध प्रजातीचे वृक्ष याने बहरलेला परिसर होता. मात्र मागील काही वर्षांपासून या जंगलात झाडांची कत्तल, शिकारी, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे यामुळे हे अभयारण्य धोक्यात आले आहे.या संरक्षित वनाचे संवर्धन व्हावे व येथील वन्यजीवांचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी वन्यजीव अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानांच्या सभोवताल क्षेत्र इको सेन्सेटीव्ह झोन घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार वसईतील तुंगारेश्वर अभयारण्य परिसरसुद्धा ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला होता. यात २८ गावांच्या जवळील वन क्षेत्राचा समावेश आहे. 

आणखी वाचा-वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

त्यानंतर येथील परिसर हा सुरक्षित राहील अशी आशा होती. मात्र या क्षेत्राच्या देखभाल व त्यांचे संवर्धन करण्याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याने मागील काही वर्षांपासून तुंगारेश्वर अभयारण्याच्या हद्दीलगत इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बेकायदा बांधकामांची निर्मिती होत आहे. त्या बेकायदा बांधकामामध्ये प्रदूषण पसरविणारे कारखाने उभे राहिले आहेत. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. तर दुसरीकडे भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारल्या आहेत. या चाळींच्या वनहद्दीलगतच्या वाढत्या संख्येमुळे लोकांचा थेट वावर जंगलात होऊ लागला आहे. त्यामुळे येथील परिसर धोक्यात आला असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमीं मॅकेन्झी डाबरे यांनी केला आहे.

संरक्षित जंगलापासून एक किमीपर्यंत बांधकाम परवानगी  दिली जात नसताना सर्रास पणे बांधकामे उभी राहू लागली आहेत. २०१८ नंतर शीरसाड ते पोमण या भागात बांधकामे तयार झाली आहे. याच परिणाम वन्यजीवांच्या अधिवासावर झाला आहे. यावर कारवाई करण्यात यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे डाबरे यांनी सांगितले आहे.

या संरक्षित वनाचे अस्तित्व टाकावे पर्यावरण आणि वन याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून चौकशी करावी. याशिवाय इको सेन्सिटिव्ह क्षेत्र बाधित करणाऱ्यांच्या विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई  अशी मागणी मॅकेन्झी डाबरे यांनी राज्याचे वनमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आणखी वाचा-स्कायवॉकचा पत्रा डोक्यावर पडून तरुणी जखमी, मिरा रोड मधील घटना

शासन स्तरावरून कारवाईचे आदेश

तुंगारेश्वर अभयारण्यात होत असलेले अतिक्रमण यावर कारवाई करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. राज्याचे विभागीय वन अधिकारी (सर्व्हेक्षण व सनियंत्रण) प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव श्रीनिवास पाचगावे यांनी  अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम मुंबई यांना याप्रकरणी आवश्यक कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा अशा सूचना पत्राद्वारे केल्या आहेत.

अधिवास धोक्यात

जंगलात शिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून पशू  पक्ष्यांसह दुर्मिळ सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहे. शिकार करण्यासाठी जंगलात वारंवार आगी लावण्यात येत आहे. ते रोखण्यासाठी वनविभागाला अपयश येत आहे. दुसरीकडे भूमाफियांनी अतिक्रमण करून जंगल गिळकृत करण्यास सुरवात केली आहे. याचा फटका अभयारण्यातील पशू पक्षी आणि त्यांच्या अधिवासांवर होत. सुरवातीला या तुंगारेश्वर जंगलात मोठ्या संख्येने वन्य प्राणी व पक्षी अधिवास करीत होते. आता या कडे प्रशासन व वनविभाग यांचे दुर्लक्ष होऊ लागल्याने जंगल पट्टा नष्ट होऊन वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. असून अनेक दुर्मिळ प्रजांती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही प्राणी आता थेट मानवी वस्तीत सुद्धा येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तुंगारेश्वरचे काही क्षेत्र हे मांडवी वनक्षेत्रात येते.त्यामुळे सर्वेक्षण केल्यानंतरच कोणते क्षेत्र कोणत्या भागात येत आहे ते समजेल आणि त्यानुसार पुढील कारवाई करता येईल. -उदय ढगे, जिल्हा वनअधिकारी, पालघर

इको सेन्सेटिव्ह क्षेत्र हे आमच्या हद्दीत येत नाही. ते क्षेत्र राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात येत आहे. त्यामुळे त्यात निर्माण झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. -मधुमिता, उपवनसंरक्षक डहाणू