भाईंदर : मे अखेरीस येणाऱ्या उत्तन च्या आंब्याचा हंगाम यंदा वळवाच्या पावसामुळे चुकला आहे. परिणामी ५० टक्के आंब्याचे उत्पन्न घटले असून आर्थिक नुकसान झाल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे. भाईंदर पश्विम येथील उत्तन परीसरात असलेल्या भुभागात अनेक वर्षांपासून आंब्याची लागवड केली जाते. कोकण किनारपट्टीवरील या आंब्याला उत्तनचा राजा अशी ओळख आहे.महत्वाची बाब म्हणजे हा आंबा अत्यंत उशिरा मे महिन्याच्या अखेरीस येत असल्यामुळे आंब्याची विशेष मागणी असते.मात्र यंदा वेळेपूर्वीच सुरु झालेल्या पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
प्रामुख्याने जानेवारी महिन्यात पडलेल्या पावसामुळे बहुतांश आंब्याची मोहर खराब झाली होती. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या आंब्यावर बागायतदारांना मोठी आशा होती. परंतु मे महिन्याच्या सुरुवातीपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे आंबे खराब होऊन ५० टक्के आर्थिक नुकसान झाले असून यामुळे आंबे लागवडीचा खर्च देखील भरून निघाला नसल्याची बागायतदार प्रशांत शाह यांनी व्यक्त केली आहे.
नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी
उत्तन येथील परिसरलेल्या पट्ट्यात अनेक बागायतदार आंब्याचे उत्त्पन्न घेतात.तसेच या भागात अनेक पर्यटक स्थळ असल्यामुळे स्थानिक नागरिक देखील आंब्याची विक्री करून आपली उपजीविका भागवतात.त्यामुळे आंब्याचे अवकाळी पावसामुळे घटलेले उत्त्पन्न हे प्रत्यक्ष रित्या येथील बागायतदाराना मोठे नुकसान दायी आहे.शिवाय आंब्याच्या लागवडी करीता केलेला खर्च देखील भरून निघत नसल्यामुळे पुढच्या वर्षी उत्त्पन्न घेणे बागायतदाराना कठीण होणार आहे.म्हणून वळवाच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची तहसीलदार कार्यालयात तक्रार करण्यात आली असून राज्य शासनाच्या मदतीची मागणी केली जात आहे.
…म्हणून आंबे खायला मिळाले
उत्तनचा आंबा प्रामुख्याने हा मे अखेरीस येतो. मात्र यंदा सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक बागायतदारांनी मुदत कालावधीपूर्वीच अनेक आंबे हे झाडावरून तोडून खाली घेतले होते. त्यानंतर या आंब्यांना पिकवण्याची शक्कल लढवल्यामुळे यंदा मागील चार वर्षाच्या तुलनेत हे आंबे नागरिकांना काहींशा प्रमाणात खायला मिळाले असल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले आहे.