वसई: वसई पश्चिमेच्या अंबाडी येथील शंभर फूटी रस्त्यासह विविध ठिकाणच्या भागातील रस्त्यावर गॅरेज दुरुस्तीची दुकाने,  वाहन विक्री, बेकायदेशीर वाहने पार्किंग करणे अशा प्रकारे अतिक्रमण करण्यात येत आहे. त्यामुळे येथील रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यात सापडू लागला आहे.

वसई पश्चिमेच्या भागात अंबाडी रोड परिसर आहे. या मुख्य रस्त्याला लागूनच शंभर फूटी रस्ता गेला आहे. विशेषतः सनसिटी सह अन्य ठिकाणच्या भागाला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. मात्र याच रस्त्यावर वाहन विक्रेते, गॅरेज वाले यांचे अतिक्रमण वाढत असल्याने चित्र दिसून येत आहे. यामुळे येथून  ये जा करताना नागरिकांना अडथळे निर्माण होत आहे. जो दोन लेन चा रस्ता होता तो आता केवळ एक लेनचा झाला आहे. त्यातच काही बेकायदेशीरपणे वाहने उभी असतात. काही जण तर अगदी  दुभाजकाला लागूनच वाहने उभी केली जात आहेत.

या प्रकाराकडे महापालिका व वाहतूक विभागाने दुर्लक्ष केले असल्याने दिवसेंदिवस या रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासाठी रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करावेत अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्या 

याशिवाय या परिसरात पालिकेकडून कोणत्याही प्रकारचे वाहनतळ (Parking Zone) उपलब्ध नसल्याने नागरिकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागतात. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते, ज्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतो. नागरिकांनी मागणी केली आहे की, पालिकेने या परिसरात ‘पे अँड पार्क’ सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच रस्त्यावरील सर्व अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा. त्याने वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.