वसई:- विरार पश्चिमेच्या अर्नाळा बंदरपाडा या गावात दरोडे खोराने एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. यात वृद्ध दांपत्य व त्यांची मुलगी असे तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विरार पश्चिमेच्या अर्नाळा बंदरपाडा गावात प्राध्यापक सचिन गोवारी यांचे कुटुंब राहते. त्यांच्या घरावर सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. यावेळी दरोडे खोराने घरातील सदस्यांवर हल्ला चढवला. यात तीनजण गंभीर पणे जखमी झाले आहेत. यात जगन्नाथ गोवारी (७६), लीला गोवारी (७२) आणि नेत्रा गोवारी (५२) अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी विरारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत आम्ही पोलिसांना माहिती दिली आहे. सद्यस्थितीत माझ्या आई वडील व बहिणीवर उपचार सुरू आहेत. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन हल्लेखोराला लवकर ताब्यात घेऊन त्यावर कारवाई करावी असे प्राध्यापक सचिन गोवारी यांनी सांगितले आहे.

या घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पाठवून तपास सुरू करण्यात आल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले आहे.

गावात भीतीचे वातावरण…

गोवारी कुटुंबावर प्राणघातक झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी कधी असा भयंकर प्रकार घडला नव्हता परंतु आता वाढत्या भाडेकरूंची संख्या यामुळे गावातील वातावरण अधिकच भीतीदायक बनले असल्याचे स्थानिक नागरिक निनाद पाटील यांनी सांगितले आहे.