वसई: विरारच्या चंदनसार येथील पेट्रोलपंपाचे मालक रामचंद्र खाकराणी (७५) यांचा मृतदेह सोमवारी दुपारी मुंबई अहमदाबाद महामार्गावर त्यांच्याच गाडीत आढळून आला आहे. रविवार रात्रीपासून ते बेपत्ता होते. त्यांच्या चालकाने ही हत्या केली असल्याची शक्यता आहे. नायगाव पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर येथे राहणारे रामचंद्र खाकराणी (७५) यांचा विरारच्या चंदनसार येथे पेट्रोलपंप आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते व्यवस्थापकाकडून ५० हाजर रुपये घेऊन घरी येण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा नेहमीचा चालक मुकेश खुबचंदानी (५४) हा होता. मात्र खाकराणी घरी पोहोचले नाही. त्यांच्या मुलाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र खाकराणी आणि चालक मुकेश खुबचंदानी या दोघांचे फोन बंद येऊ लागले. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा – नालासोपाऱ्यातील रक्तरंजित संघर्ष, ११ जणांना अटक

हेही वाचा – वसई विरारमध्ये पालिकेची वृक्ष गणनेकडे पाठ, आठ वर्षे उलटून गेल्यानंतरही वृक्षगणना नाही

सोमवारी दुपारी रामचंद्र खाकराणी यांचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडीत आढळून आला आहे. गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चालक मुकेश खुबचंदानी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.