वसई: वसई विरार शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक नियोजनाचा यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असताना. शहरातील विविध रस्त्यांवर बेदरकारपणे टँकर चालवणाऱ्या चालकांमुळे गंभीर अपघाताच्या घटनाही आता घडू लागल्या आहेत.वसई विरार शहरात गेल्या काही काळात टँकरच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील पाण्याची वाढती मागणी पाहता मुख्य रस्ते, जोडरस्ते, तसेच गाव पाड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र पाण्याची वाहतूक करणारे टँकर दिसून येतात. पण, यातले बहुतांश टँकर चालक वाहतूक नियमांचे पालन न करता बेजबाबदारपणे टँकर चालवत असतात.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विरार पूर्वेच्या चंदनसार परिसरात टँकर अपघातात प्रताप नाईक या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघाताच्या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील टॅंकर चालकांच्या बेदरकारपणावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.यापूर्वी सुद्धा शहरात अनेक टँकर अपघाताच्या घटना घडल्या आहेत.जुन्या, खिळखिळ्या झालेल्या तसेच नोंदणी नसलेल्या टँकरमधून पाण्याची वाहतूक करण्यावर पूर्णपणे बंदी असताना देखील शहरात अशा अवैध टँकरचा वापर सर्रास सुरू असल्याचे दिसून येते. तसेच गळके – नादुरुस्त टँकर, क्लिनर नसणे, अप्रशिक्षित चालक, अपुरी कागदपत्र अशा विविध टँकरचीसुद्धा बिनदिक्कतपणे वाहतूक चालकांकडून सुरू आहे. वसई विरार शहरात टँकर चालकांची वाढत जाणारी मुजोरी आणि त्यामुळे सातत्याने घडणारे अपघात यामुळे पोलिसांकडून टँकर चालकांवर केल्या जाणाऱ्या कारवाईवरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.शहरातील टँकरची सातत्याने तपासणी करून जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाते असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
टँकर गळतीमुळे अपघात
शहरात धावणाऱ्या बहुतांश टँकरमधून वाहतूकीदरम्यान सतत पाणीगळती सुरू असते. यामुळे टँकरमधील पाणी रस्त्यावर पडून रस्ता निसरडा होतो. या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा वाहनचालकांचा प्रामुख्याने दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात घडतात. तर काही ठिकाणी वाहने एकमेकांना धडकण्याच्या घटना देखील घडतात.
टँकर अपघाताच्या घटना
२२ सप्टेंबर २०२५ रोजी विरार टँकर अपघातात प्रताप नाईक (५५) यांचा मृत्यू
३१ जुलै २०२५ रोजी नालासोपारा येथे राहणारे संदीप खांबे (४४) हे दुचाकीवरून मुलगी कणिका खांबे (१४) हिला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. याच दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरची धडक लागून अपघात घडला होता यात त्यांचा संदीप यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
२३ फेब्रुवारी २०२४ नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन येथे टँकर अपघातात दुचाकीस्वार अनिल मनोरथ याचा मृत्यू
५ मार्च २०२४विरार नारंगी फाटा येथे टँकर अपघातात शैलेश कोरगावकर याचा मृत्यू
१३ मार्च २०२४ नालासोपारा अलकापुरी येथे ११ वर्षीय पवन सिंग या मुलाचा मृत्यू
२ एप्रिल २०२४ विरारच्या जकात नाका येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला टॅंकरने चिरडले यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.
१९ एप्रिल २०२४ विरारच्या ग्लोबल सिटी मध्ये टॅंकर मागे वळण घेताना आजी आणि नातू या दोघांचा मृत्यू झाला होता.
३ सप्टेंबर २०२४ नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथे प्रिन्स मिश्रा (२३) तरुणाचा मृत्यू