वसई: वसई विरार शहरात महावितरणने विविध ठिकाणच्या भागात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरूवात केली आहे. शहरात ९ लाख ६१ हजार इतकी स्मार्ट मीटर बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ३९ हजार म्हणजेच ३५ टक्के इतके स्मार्ट मीटर बसवून झाले आहेत.
वसईच्या महावितरण मंडळाच्या अंतर्गत शहरात घरगुती, व्यावसायिक, शासकीय, औद्योगिक अशा विविध साडे दहा लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र काही वीज ग्राहक मीटर मध्ये फेरफार करून वीज चोरी करतात. आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची वीज चोरी झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती.
मीटर सदोष असल्याने वीज देयक रक्कम व रिडींग यात तफावत आढळून येते. तर तांत्रिक अडचणीमुळे मीटर गणन योग्य पद्धतीने होत नाही याचा फटका महावितरणसह वीज ग्राहकांना बसत आहे. यात पारदर्शकता यावी तसेच अचूक वीज देयक ग्राहकांच्या हाती जावे यासाठी शहरातील लघुदाब वीज ग्राहकांकडे अत्याधुनिक असे टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जुने मीटर बदलून त्या ठिकाणी टीओडी स्वरूपाचे स्मार्ट मीटर लावले जात आहेत.
वसईत ९ लाख ६१ हजार १७४ वीज ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलून त्याठिकाणी स्मार्ट मीटर लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ३९ हजार ४०५ इतके वीज मीटर बदलून घेण्यात आले आहेत अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय जे सदोष वीज मीटर ते सुद्धा बदलण्यात येत आहेत त्यात जवळपास ६० हजार ८६७ इतके मीटर बदलून घेण्यात आले आहेत.
या मीटरमुळे मीटर फेरफार करणे, विद्युत प्रवाह (करंट) समतोल नसणे, कमी पॉवर फॅक्टर असणे, न्यूट्रल डिस्टर्बन्स, करंट किंवा व्होल्टेज कमीजास्त असणे, विद्युत प्रवाह नसणे, सिटी व पीटी बायपास करणे अशी सर्व माहिती ऑनलाइन स्वरूपात समोर येत आहे. या वीज चोरी वर लक्ष ठेवण्यासाठी दोन पथके ही नियुक्त केली आहे असे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.
व्यावसायिक मीटरसाठी मोहीम
पहिल्या टप्प्यात महावितरणने शासकीय कार्यालये अशा ठिकाणी वीज मीटर बदलण्यात आली आहेत. आता शहरात व्यावसायिक वीज ग्राहक आहेत. त्यांचे वीज मीटर बदलण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.
स्मार्ट मीटरला विरोध
वीज देयक थकवणाऱ्या, वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने ‘स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ योजना आखली आहे. वसई विरार मध्येही स्मार्ट मीटर बसविले जात आहेत.मात्र काही वीज ग्राहकांनी या स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केला जात आहे. आधीच वसईतील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते जर स्मार्ट मीटर बसविल्यास अतिरिक्त वीज देयक येण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे आधी वीज वितरण व्यवस्था स्मार्ट करा अशी प्रतिक्रिया वीज ग्राहकांनी दिली आहे. स्मार्ट वीज मीटर बाबत संभ्रम असणाऱ्या वीज ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ९ विभागीय कार्यालयात प्रात्यक्षिक देण्यासाठी जुने आणि स्मार्ट अशी मीटर ठेवून त्यांच्या रिडींग बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे असे महावितरणने सांगितले.
