वसई: वसई विरार शहरात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसात तहसील प्रशासनाकडून दहा हजार घरांचे तर ६३२ शेतजमिनींचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तर नुकसानग्रस्तांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई-विरार शहराला मोठा फटका बसला होता. यामुळे शहरातील सखल भागात पाणी गेल्याने, नागरिकांच्या घरात आणि इमारतींमध्ये पाणी जाऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच काही ठिकाणी घरांवर विजेचे खांब आणि झाडे कोसळून नुकसान झाले होते. तर किनारी भागातील घरांवरील पत्रे उडून गेल्याचे प्रकारही काही ठिकाणी घडले होते.
या नुकसानीनंतर नागरिकांकडून सातत्याने नुकसानभरपाईची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेऊन २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत महसूल अधिकाऱ्यांकडून तब्बल १० हजार ४४८ घरांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. शासनाच्या निकषानुसार नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला नुकसानभरपाई लवकरच दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे
वसई-विरारच्या ग्रामीण पट्ट्यात भात, पालेभाज्या, फळे आणि फुलशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, अतिवृष्टीमुळे या शेतीचेही मोठे नुकसान झाले. तहसील प्रशासनाकडून ६३२ शेतीचे पंचनामे करण्यात आले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा हा सविस्तर पंचनामा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी आणि नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी शासनस्तरावर पाठवण्यात आला आहे. अहवाल मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
वसई विरार शहरात पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. लवकरच नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल. – राजाराम देवकाते, निवासी नायब तहसीलदार, वसई