वसई: वसई-विरार महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील पदपथांची (फुटपाथ) अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अतिक्रमण, वाढलेले शेवाळे आणि गवत, अनधिकृत पार्किंग तसेच बांधकाम साहित्याच्या ढिगाऱ्यांमुळे पदपथ आता चालण्यायोग्य राहिलेले नाहीत. परिणामी, पादचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून वर्दळीच्या रस्त्यांवरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने पदपथांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वर्दळीच्या रस्त्यावर पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, म्हणून शहरात विविध ठिकाणी पदपथ बांधण्यात आले आहेत. पण, गेल्या काही काळात महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे याच पदपथांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. विरारमधील विवा महाविद्यालय, वसईतील एव्हरशाईन नगर, पापडी, माणिकपूर, बंगली नाका, नालासोपाऱ्यातील कॅपिटल मॉल, लिंक रोडसह अनेक भागांतील पदपथ वापरायोग्य राहिलेले नाहीत.

पावसाळ्यात पदपथांवर साचणाऱ्या पाण्यामुळे उगळलेले शेवाळे आणि गवतामुळे पदपथ निसरडे झाले आहेत. तर दुसरीकडे फुटलेल्या लाद्या आणि उघड्या गटारांमुळे पदपथांवर चालणे नागरिकांसाठी धोकादायक बनू लागले आहे. त्यातच अनेक ठिकाणी वाहनचालकांकडून पदपथांवर बिनधास्तपणे वाहने उभी केली जात आहेत. तर इमारतींच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य पदपथांवर टाकले जात असल्यामुळे नागरिकांसाठी पदपथ वापरणे जवळपास अशक्य झाले आहे. पदपथांची दुरावस्था पाहता पादचाऱ्यांचे अपघात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन पदपथांची दुरुस्ती करावी आणि अतिक्रमणावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पदपथावर बसलेल्या फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई सुरू असते याशिवाय जे खराब झाले असतील त्यांची ही दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

पदपथांना अतिक्रमणाचा विळखा

रेल्वे स्थानके, बस थांबे आणि बाजारांच्या ठिकाणी वाढलेल्या फेरीवाल्यांनी आता थेट पदपथांवरच आपली दुकाने थाटली आहेत. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांसाठी चालण्यास जागाच उरलेली नाही. विशेष म्हणजे, हेच अतिक्रमण वर्दळीच्या भागातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण बनले आहे. त्याचप्रमाणे, काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांनीही पदपथांचा बराचसा भाग बळकावला आहे, ज्यामुळे सुरुवातीला रुंद असलेले पदपथ आता इतके अरुंद झाले आहेत की, एका व्यक्तीलाही त्यावर चालणे अवघड झाले आहे.