वसई: वसई विरार शहरात विविध ठिकाणी व्यक्ती बुडण्याच्या घटना समोर येत असतात. या बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने ७ आधुनिक स्वरूपाची शोध यंत्र ( सोनार स्कॅनर सर्च कॅमेरा) घेतली आहेत. त्यामुळे पाण्यात बुडालेली व्यक्ती कोणत्या जागी आहे याची माहिती मिळून बाहेर काढण्यास मदत होणार आहे.
वसई विरार शहरात तलाव, विहिरी, खदाणी, नाले यासह अन्य पाण्याची ठिकाणे आहेत. विशेषतः पावसाळ्यात तलाव व खदाणी तुडूंब होत असल्याने मोठ्या संख्येने लहान मुलं व तरुण मंडळी पोहण्यासाठी पाण्यात उतरतात. काही वेळा पाण्याच्या खोलीचा व तेथील भागाचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडतात. यापूर्वी सुद्धा शहरात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा वेळी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून शोध मोहीम राबविली जाते. मात्र नेमक्या कोणत्या भागात व्यक्ती किंवा मुलगा बुडाला आहे याची माहिती मिळत नसल्याने शोध घेताना वेळ जातो. काही वेळा रात्र झाल्यानंतर ही शोध मोहीम थांबवावी लागते.
अशा पाण्यात बुडालेल्यांचा शोध जलदगतीने लागावा व त्यांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने सात नवीन आधुनिक स्वरूपाची शोध यंत्र ( सोनार स्कॅनर सर्च कॅमेरा) घेतली आहेत. त्यामुळे पाण्यात बुडालेली व्यक्ती किती खोली वर आहे. कोणत्या भागात बुडाली आहे याची माहिती या यंत्राद्वारे मिळते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पुढील शोध मोहीम राबविणे अधिक सोपे जाते यात वेळ ही वाचणार असल्याचा दावा अग्निशमन विभागाने केला आहे.
पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधासाठी ही यंत्र महत्त्वाची आहेत. त्या यंत्राद्वारे सर्च होऊन बुडालेल्या व्यक्तीची माहिती व त्यानुसार उपाययोजना आखण्यास मदत होत आहे. :- दिलीप पालव, अग्निशमन दल प्रमुख
असे आहे यंत्र
सदर यंत्रणा ही पाणी क्षेत्रातील ५० मीटर खोली पर्यंतचे ‘घटक’ स्कॅन करते.
यंत्रणेची पाणी क्षेत्रातील सभोवतालची स्कॅनिंग रेंज हो शॉर्ट १० मीटर / मध्यम २० मीटर / लांब ५० मोटर इतकी आहे.
अंडर वॉटर सोनार स्कॅनर या उपकरणाचे वजन हे १.४ किलो इतके आहे.
सदर अंडर वॉटर सोनार स्कॅनर हे उपकरण पाणी क्षेत्रात पाण्याचा दाब सहन करण्याच्या परिमाणतेत IP ६८ (Ingress Protection) प्रमाणित आहे.
हे उपकरण हे बॅटरी ऑपरेटेड आहे
या द्वारे दुर्घटनास्थळाच्या सलग ८ तास स्कॅनिंग व १६ तास सर्च ऑपरेशन करता येणे शक्य आहे.