वसई : जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिनानाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी वसई विरार शहर महापालिकेतर्फे समुद्र किनारपट्टी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागिरक मिळून ५ हजारांहून अधिक जण सहभागी झाले होते. या मोहीमत एकूण ३५ टन कचरा संकलित करण्यात आला आहे.
२१ सप्टेंबर हा जागतिक किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसानिमित्त वसई विरार महाापालिका व मे.मेकिंग द डिफ्रेन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेच्या सहकार्याने वसईच्या सुरुची समुद्रकिनार्यावर व्यापक स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या स्वच्छता मोहिमेचा आरंभ करण्यात आला.
या मोहिमेत ५ हजारांहून अधिक शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस विद्यार्थी, अग्निशमन जवान, विविध सामाजिक संस्थाचे स्वयंसेवक, बचत गटाच्या महिला, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक आदींनी सहभाग घेतला होता.या मोहिमेसाठी महापालिकेने नियोजन केले होते. त्यानुसार सुरुची समुद्र किनाऱ्यावरील २ किलोमीटरच्या पट्ट्यातील १० भाग तयार करण्यात आले होते. सर्व विद्यार्थी, नागरिकांना तो परिसर विभागून देण्यात आला होता. त्यानुसार स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत ३५ टन कचरा गोळा करण्यात आला. या कचऱ्याचे विलगीकरण करून हा कचरा पालिकेच्या कचराभूमीवर नेण्यात आला.
विशेष म्हणजे या स्वच्छता मोहिमेत जी जी महाविद्यालयातील साहील या दिव्यांग दृष्टीहीन विद्यार्थ्यानेही सहभाग घेवून स्वच्छतेविषयी समाजाला मोठी प्रेरणा दिली.
समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवून आज सुरुची समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. आज घेतलेली स्वच्छता मोहीम जरी संपली असली तरी वसई विरार शहर महापालिका क्षेत्रात ही स्वच्छता मोहिमेची सुरुवात आहे. यापुढेही महापालिकेमार्फत अशा स्वच्छता मोहीमा वेळोवेळी व मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतील. शहराला विस्तीर्ण व सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या समुद्र किनाऱ्यांचे संरक्षण व संवर्धन करून या ठिकाणी स्वच्छता करून येथील पर्यटन वाढविण्याकरिता महापालिका सर्वोतोपरी प्रयत्न करील. – मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका